आसगाव, १२ ऑगस्ट (वार्ता.) – बार्देश तालुक्यातील आसगाव येथील दत्तात्रय औदुंबर देवस्थानाजवळ असलेल्या झर्याशेजारी होत असलेल्या बांधकामाला पंचायतीने अनुमती दिली आहे. ही जागा देहली येथील एका बांधकाम व्यावसायिकाने विकत घेतली असून त्या ठिकाणी ११ बंगल्यांचे बांधकाम होणार आहे. या बांधकामाला आक्षेप घेत बांधकामामुळे झर्याचे पाणी प्रदूषित होईल, अशी तक्रार या देवस्थानने पंचायतीकडे नोंदवली होती. ग्रामस्थांनी या बांधकामाला विरोध दर्शवला असून ‘पंचायतीने दिलेला ना हरकत दाखला रहित करावा’, अशी मागणी केली आहे.
देवस्थानचे अध्यक्ष याविषयी म्हणाले, ‘‘या बांधकामाच्या ठिकाणी आम्हाला झर्याच्या शेजारी एक खड्डा मारलेला दिसला. त्यानंतर आम्ही ‘झर्याचे पाणी प्रदूषित होईल’, अशी तक्रार पंचायतीकडे दिली.’’ याविषयी आसगावच्या सरपंचांना विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘आसगाव ग्रामपंचायतीने प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आरोग्य खाते यांना या ठिकाणी येऊन परीक्षण करण्यास सांगितले होते. परीक्षणाच्या वेळी पंचायतीचे सदस्य आणि आरोग्य खात्याचे अधिकारी उपस्थित होते; परंतु प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आले नाहीत. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने परीक्षणासाठी पुढची दिनांक मागितली. ९ ऑगस्ट २०२१ या दिवशी प्रदूषण मंडळाचे अधिकारी परीक्षणासाठी आले, त्या वेळी पंचायत सदस्य आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्यांनी झर्याच्या अगदी जवळ ज्या बंगल्याचे बांधकाम चालू आहे, ते आम्ही थांबवू आणि पंचायतीला तसे कळवू, असे सांगितले. पंचायतीला कळवल्यानंतर आम्ही त्या बंगल्याच्या मालकाला पत्र पाठवू.’’
या बांधकामाचा नकाशा आरोग्य खाते आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना देतांना त्यामध्ये हा झरा दाखवण्यात आला नव्हता, असे काही ग्रामस्थांचे मत आहे. आरोग्य खात्यातील अधिकार्यांनाही त्या जागी पाण्याचा झरा आहे, हे ठाऊक होते. एका ग्रामस्थाने सांगितले की, झर्याचे रक्षण करणे, हे शासनाचे कर्तव्य आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानंतर निर्णय घेणार्या पंचायतीला झर्याचे रक्षण करायला हवे, हे आधीच लक्षात यायला हवे होते. लोकांचा विरोध असेल, तर पंचायतीने दिलेला ना हरकत दाखला रहित करता येतो. या झर्याचे पाणी देवस्थान, तसेच ग्रामस्थ वापरतात.