डिचोली, ११ ऑगस्ट (वार्ता.) – मयेचे माजी सरपंच, सामाजिक कार्यकर्ते आणि शेतकरी सखाराम पेडणेकर यांची मये नागरिक भूविमोचन समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. २ दिवसांपूर्वी समितीच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. या बैठकीच्या वेळी समितीचे दिवंगत माजी अध्यक्ष स्वातंत्र्यसैनिक चंद्रकांत पेडणेकर यांना श्रद्धांजली वहाण्यात आली. या बैठकीला सर्वश्री कालीदास कवळेकर, हरिश्चंद्र च्यारी, यशवंत कारबोटकर, राजेश कळंगुटकर, अर्जुन नायक, आनंद वळवईकर, भानुदास साळगांवकर आणि इतर काही नागरिक उपस्थित होते.
१५ ऑगस्टला मये पंचायतीसमोर धरणे धरणार ! – सखाराम पेडणेकर
‘मये येथील भूमीचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारकडून अपेक्षित असे काही घडतांना दिसत नाही. या प्रश्नासंबंधी शासकीय यंत्रणेकडून जलद प्रक्रिया होतांना दिसत नाही. त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी १५ ऑगस्ट २०२१ या दिवशी मये पंचायतीसमोर धरणे धरणार’, असे सखाराम पेडणेकर यांनी सांगितले. (गोवा मुक्तीच्या षष्ट्यब्दिपूर्तीपर्यंत गोव्यातील एक गावातील भूमीसाठी लढा द्यावा लागणे प्रशासनाला लज्जास्पद ! – संपादक)
ते म्हणाले, ‘‘या प्रकरणी अजून ३०० लोकांच्या अर्जांवर प्रक्रिया होणे प्रलंबित आहे. कायद्याच्या दृष्टीने आलेले अडथळे दूर करून ही प्रक्रिया पूर्ण करून या लोकांना न्याय देण्यासाठी शासनाने लक्ष देणे अपेक्षित आहे. मये नागरिक भूविमोचन समिती या प्रश्नावर आपली भूमिका १५ ऑगस्टला धरणे आंदोलनात घोषित करणार आहे.’’