मागील साडेतीन वर्षे मला आधुनिक वैद्य (डॉ.) नितीन कोठावळे यांच्या समवेत सेवा करण्याची संधी मिळाली. त्या कालावधीत मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. नम्रता
आधुनिक वैद्य (डॉ.) नितीन कोठावळे हे कान, नाक आणि घसा तज्ञ होते. त्यांना विविध विषयांचे पुष्कळ ज्ञानही होते. असे असूनही त्याविषयी त्यांच्या मनात अहंकार मुळीच नव्हता. त्यामुळे ते सर्वांशी नम्रपणे वागायचे.
२. चिकाटी
‘सोशल मिडिया’च्या सेवेच्या आरंभीच्या काळात त्यांच्या व्यस्ततेमुळे मला त्यांच्या गावी जाऊन त्यांना सेवा समजावून सांगणे शक्य नव्हते. त्यामुळे मी त्यांना ती सेवा ‘ऑनलाईन’ समजावत असे. अशा प्रकारे सेवा समजून घेण्यात त्यांना अनेक अडचणी येत असत; पण त्यांनी सर्व सेवा चिकाटीने शिकून घेतली.
३. त्यांचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होते. त्यांचे इंग्रजी भाषेतील ‘ट्वीट’ फार चांगले असायचे.
४. जिज्ञासू वृत्ती
‘सोशल मिडिया’ची सेवा करतांना सेवेतील ज्या गोष्टी त्यांना ठाऊक नसायच्या, त्या ते लिहून ठेवायचे आणि नंतर त्याविषयी मला विचारायचे.
५. विचारून कृती करणे
ते कोल्हापूर जिल्ह्यातील ‘सोशल मिडिया’ची सेवा करत होते. ‘या सेवेच्या अंतर्गत अनेक सेवा कशा करायच्या ?’, हे त्यांना ठाऊक होते, तरीसुद्धा ते सर्व सेवा विचारून करत असत.
६. प्रेमभाव
त्यांच्याशी भ्रमणभाषवर बोलतांना माझ्या बोलण्यातून त्यांना ‘कुणा साधकाची प्रकृती ठीक नाही’, असे कळले, तर ते लगेच ‘त्याला कोणते साहाय्य करूया ?’, असा विचार करायचे.
७. आधार देणे
माझ्या एका जुन्या व्याधीमुळे मला अधूनमधून ‘स्टिरॉईड’ घ्यावे लागायचे. ‘स्टिरॉईड’चे दुष्परिणाम समजल्यामुळे मला त्याचा ताण आला होता. हे त्यांना कळल्यावर त्यांनी मला त्याचे शास्त्र समजावून सांगून आधार दिला. त्यामुळे माझ्या मनावरचा ताण नाहीसा झाला.
८. भाव
अ. त्यांना ‘सोशल मिडिया’च्या सेवेच्या अंतर्गत अनेक वेळा समाजातून चांगला प्रतिसाद मिळत असे. तेव्हा त्यांच्या मनात ‘हे गुरुदेवांच्या कृपेमुळे झाले’, असा भाव असायचा.
आ. एकदा ते आणि मी गोव्याला रामनाथी आश्रमात गेलो होतो. तेथे स्वागतकक्षात प.पू. भक्तराज महाराज यांची मोठी प्रतिमा लावली आहे. ते त्या प्रतिमेला प्रतिदिन भावपूर्ण नमस्कार करायचे.
इ. फार पूर्वी एकदा त्यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी भेट झाली. ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळेच त्यांचे दर्शन झाले आणि त्यांना भेटण्याची संधी मिळाली’, यांसाठी त्यांना पुष्कळच कृतज्ञता वाटत होती. या आणि अशा अनेक प्रसंगांवरून ‘त्यांच्या मनात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी पुष्कळ भाव होता’, हे माझ्या लक्षात आले.
आधुनिक वैद्य (डॉ.) नितीन कोठावळे यांच्यामधील विविध सद्गुण आणि आध्यात्मिक गुण यांमुळे अल्पावधीतच मला ते माझे चांगले मित्र वाटू लागले होते. ‘त्यांच्या रूपाने मला एका चांगल्या साधकाचा सत्संग मिळाला’, यासाठी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. आदित्य शास्त्री, कोल्हापूर सेवाकेंद्र (१६.७.२०२१)