राज्यसभेतील विरोधकांच्या गोंधळामुळे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या डोळ्यांत अश्रू !

अशा घटना रोखण्यासाठी सभापती नायडू यांनी भावनाशील होण्याऐवजी कठोर होऊन गोंधळ घालणार्‍या संबंधित सदस्यांना निलंबित करून त्यांच्याकडून वाया गेलेल्या वेळेचा खर्च वसूल केला पाहिजे ! – संपादक

राज्यसभेतील विरोधकांच्या गोंधळामुळे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या डोळ्यांत अश्रू

नवी देहली – राज्यसभेत १० ऑगस्ट या दिवशी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी कृषी कायद्यांचा विरोध करतांना प्रचंड गोंधळ घातला. काही खासदारांनी बाकावर उभे रहात विरोध दर्शवला. या एकूण गोंधळावरून उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या डोळ्यांतून अश्रू आले.

याविषयी ११ ऑगस्टला सभागृहात बोलतांना नायडू म्हणाले की, सभागृहात जे काही झाले, ते पुष्कळ वाईट घडले. लोकशाहीसाठी ही लाजिरवाणी घटना आहे. संसदेतील काही खासदारांनी मोकळ्या जागेमध्ये, तसेच बाकावर उभे राहून पुस्तिका भिरकावल्या. हे सर्व दृश्य पाहून मला रात्रभर झोप आली नाही. काही सदस्यांनी सभागृहाचे अपवित्र चित्रीकरण केले आणि सामाजिक माध्यमांत छायाचित्रे प्रसारित केली. ही अत्यंत चिंतेची गोष्ट आहे. सभागृहाची प्रतिष्ठा कशी भंग होते, हे त्यांनी जनतेला दाखवून दिले. आक्रामक म्हणून स्वत:ला सादर करण्याच्या काही सदस्यांधील स्पर्धेचा हा परिणाम आहे.