पंचगंगेला आलेल्या महापुराच्या वेळी जीव धोक्यात घालून वीज चालू करणार्‍या कर्मचार्‍यांचे करवीरच्या जनतेने केले अभिनंदन !

पोहत जाऊन उंचगाव येथील वीजपुरवठा पूर्ववत् चालू केला. (प्रातिनिधिक चित्र )

कोल्हापूर – पंचगंगेला आलेल्या महापुराच्या वेळी वीजवितरण आस्थापनाचे उचगाव वितरण कार्यालयातील कर्मचारी किरण कोळी आणि विशाल ठाकूर, तसेच गांधीनगर वीजवितरण कार्यालयातील नितीन कांबळे, अमित चौगुले, अमित पवार, सुनील खटावकर, सुशील कांबळे या कर्मचार्‍यांनी महापुरात पोहत जाऊन पाण्यात असलेल्या विजेच्या पोलावर चढून अनुक्रमे उंचगाव अन् गांधीनगर येथील वीजपुरवठा पूर्ववत् चालू केला. जीव धोक्यात घालून नागरिकांच्या सेवेसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांविषयी सर्व जनतेच्या वतीने करवीर शिवसैनिकांनी त्यांना अभिवादन केले.

या लोकसेवकांचा आदर्श सर्व शासकीय विभागातील कर्मचारी आणि अधिकारी यांनी घ्यावा. उचगावचे शाखा अभियंता लाड साहेब आणि गांधीनगरचे शाखा अभियंता सुतार साहेब यांच्या नेतृत्वाखाली अन् मार्गदर्शनाखाली वीजवितरणच्या या ६ कर्मचार्‍यांनी दिलेली सेवा करवीर पूर्व परिसरातील जनता कदापि विसरणार नाही. पुन्हा एकदा या लोकसेवकांना अभिवादन, असे शिवसेना करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी सांगितले.

या वेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, युवासेनेचे विनायक जाधव, संतोष चौगुले, हिंदुत्वनिष्ठ शरद माळी, ग्राम पंचायत सदस्य महेश खांडेकर, विराग करी, महादेव चव्हाण, यांसह शिवसैनिक आणि वीजवितरण आस्थापनाचे कर्मचारी उपस्थित होते.