राष्ट्रध्वज छापलेल्या ‘टी-शर्ट’ची विक्री करून ध्वजसंहितेचा भंग करणार्‍यांवर गुन्हा नोंदवून राष्ट्रध्वजाचा अवमान रोखावा !

  • हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घाटकोपर पोलिसांना निवेदनाद्वारे आवाहन !

  • अवमानकारक ‘टी-शर्ट’ विक्रीसाठी ठेवणार्‍या १३ दुकानांची नावे पोलिसांकडे सुपूर्द !

मुंबई, १० ऑगस्ट (वार्ता.) – घाटकोपर बाजारपेठेतील कपडे विक्री करणारे अनेक दुकानदार, तसेच पादचारी मार्गावरील विक्रेते यांनी त्यांच्या दुकानांमध्ये तिरंगी, तसेच राष्ट्रध्वज छापलेले ‘टी-शर्ट’ विक्रीसाठी ठेवले आहेत. हे ‘टी-शर्ट’ परिधान केल्यानंतर घामाचा दुर्गंध येणे, धुतांना ते इतरत्र ठेवले जाणे यांतून एकप्रकारे राष्ट्रध्वजाचा अवमान होणार आहे. ध्वजसंहितेनुसार हा राष्ट्रध्वजाचा अवमान असून अशा प्रकारे ‘टी-शर्ट’ची विक्री करणार्‍या दुकानदारांवर पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी. त्यांच्यावर गुन्हा नोंदवून हे आक्षेपार्ह टी-शर्ट कह्यात घ्यावेत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. याविषयी १० ऑगस्ट या दिवशी समितीच्या वतीने श्री. रवींद्र नलावडे यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे.

या निवेदनावर राष्ट्रध्वजाप्रमाणे दिसणारे टी-शर्ट विक्रीसाठी ठेवलेल्या १३ दुकानांची नावेही देण्यात आली आहेत. या निवेदनात म्हटले आहे की, ‘‘क्रांतीकारकांनी राष्ट्रध्वज भूमीवर पडू नये, यासाठी लाठ्या खाल्ल्या. वेळप्रसंगी प्राणांचेही बलीदान दिले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राष्ट्रध्वजाचा अशा प्रकारे होत असलेला अवमान म्हणजे क्रांतीकारकांच्या बलीदानाची एकप्रकारे चेष्टाच नव्हे का ? राष्ट्रध्वजाचा मान राखणे, हे प्रत्येक भारतियाचे कर्तव्य आहे. जे विक्रेते शासनाचा अध्यादेश डावलून प्लास्टिकचे राष्ट्रध्वज आणि राष्ट्रध्वज छापलेले टी-शर्ट यांची विक्री करत आहेत अन् ज्या व्यक्ती, संस्था, तसेच समूह राष्ट्रध्वजाचा अवमान करतात, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी.’’