सातारा शहरात फिरत्या पथकांद्वारे कोरोना चाचणीला वेग !

प्रतिकात्मक छायाचित्र

सातारा, ९ ऑगस्ट (वार्ता.) – कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी शहरातील बाजारपेठेमध्ये, तसेच मुख्य ठिकाणी विक्रेते आणि नागरिक यांची जागेवरच फिरत्या पथकाद्वारे कोरोना चाचणी करण्यात येत आहे. या चाचणीमध्ये ‘पॉझिटिव्ह’ आढळून आल्यास त्यांना अलगीकरण कक्षामध्ये पाठवण्यात येत आहे, अशी माहिती महापालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिली.

मुख्याधिकारी बापट पुढे म्हणाले की, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या निर्देशानुसार शहरातील निर्बंध टप्प्याटप्प्याने हटवण्यात येत आहेत. सर्व दुकाने सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत चालू ठेवण्यास अनुमती देण्यात आली आहे. त्यामुळे बाजारपेठांमध्ये गर्दी वाढत आहे. सर्व नागरिकांनी कोरोना चाचणी केलेली आहे, असे नाही. त्यामुळे फिरत्या पथकाद्वारे विक्रेते आणि नागरिक यांची जागेवरच कोरोना चाचणी करण्यात येत आहे. दिवसभरात शहरामध्ये ३०० ‘ॲन्टिजेन’ चाचण्या आणि २५० ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचण्या करण्यात येत आहेत. गत मासात केलेल्या चाचणीनुसार ‘पॉझिटिव्हिटी रेट’ १ टक्काही नाही.