सावंतवाडीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांचे स्थानांतर रहित करण्याची मागणी

तहसीलदार म्हात्रे यांचे अचानक करण्यात आलेले स्थानांतर तात्काळ रहित करा

सावंतवाडी – येथील तहसीलदार राजाराम म्हात्रे यांचे स्थानांतर रत्नागिरी येथे करण्यात आले आहे. तहसीलदार म्हात्रे यांचे अचानक करण्यात आलेले स्थानांतर तात्काळ रहित करा, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध स्तरांतून होऊ लागली आहे.

जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर, भाजप महिला शहर अध्यक्षा मोहिनी मडगावकर, मनसेचे शहर अध्यक्ष आशिष सुभेदार, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजू धारपवार आदींनी ही मागणी केली आहे.

‘गेल्या ३ वर्षांच्या कार्यकाळात तहसीलदार म्हात्रे यांनी अतिशय चांगले आणि प्रामाणिकपणे काम केले आहे. कोरोना महामारीच्या काळातसुद्धा त्यांनी चांगली सेवा केली आहे. त्यामुळे त्यांच्या स्थानांतराविषयी प्रशासनाने पुनर्विचार करावा. त्यांना मुदतवाढ द्यावी अन्यथा मनसेच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येईल’, अशी चेतावणी मनसेचे शहर अध्यक्ष सुभेदार यांनी दिली आहे.