स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवतांना आलेले अनुभव

‘मी ‘पूर्वग्रहदूषितपणा’ हा स्वभावदोष दूर करण्यासाठी प्रयत्न करत होते. तेव्हा देवाने चुकीची विचारप्रक्रिया माझ्या लक्षात आणून दिली. त्यानेच ‘प्रत्येक टप्प्यावर मात कशी करायची ?’, हे शिकवले. माझ्या मनात साधक आणि नातेवाईक यांच्याविषयी पुष्कळ पूर्वग्रह होते. त्यामुळे माझ्या मनाची ८० टक्के शक्ती या विचारांत वाया जात होती. तेव्हा ‘हे थांबायला पाहिजे’, असे प्रक्रियेच्या माध्यमातून माझ्या लक्षात आले. त्यानंतर झालेले प्रयत्न येथे दिले आहेत.

अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी

१. पहिला टप्पा

‘नातेवाईक किंवा साधक यांच्या संदर्भात एखादा प्रसंग घडल्यावर माझ्या मनात विकल्प किंवा पूर्वग्रहांचा विचार आला, तरी मी सूक्ष्मातून त्यांची क्षमायाचना करत होते. ‘ते देवाचे भक्त आहेत. त्यांच्याविषयी मी अयोग्य विचार करते, म्हणजे मी देवाची अपराधी आहे’, अशी खंत वाटून मी देवाकडे क्षमायाचना करत होते. देवाने मला सांगितले, ‘जोपर्यंत आतून अपराधीपणाची भावना निर्माण होत नाही, तोपर्यंत देवाची किंवा त्या जिवाची क्षमायाचना करत रहा.’

२. दुसरा टप्पा 

अ. कुणा व्यक्तींविषयी मनात पूर्वग्रह आला, तर माझ्याकडून लगेच स्वयंसूचना दिली जात होती. ‘प्रत्येक साधक देवाचा भक्त आहे. त्याच्याविषयी मनात नकारात्मक विचार येणे अयोग्य आहे’, याची जाणीव मनाला होऊ लागली. त्या वेळी ‘हे मना, परात्पर गुरुदेवांना साधक अधिक प्रिय आहेत, तरी माझ्या मनात त्यांच्याविषयी येणारे चुकीचे विचार थांबव’, असे मनाला सांगून मी प्रयत्न करत होते.

आ. समोरचा साधक चुकत असेल, तर त्याला निरपेक्षभावाने सांगायचा प्रयत्न करत होते. ‘निरपेक्ष म्हणजे त्याला साधना म्हणून साहाय्य करायचे आणि साहाय्य करतांना ‘त्याने आपले ऐकले पाहिजे’, हा विचार नको’, असे देवाने सांगितले. त्या साधकाला साहाय्य करतांना ‘माझे सांगतांना काही चुकले असेल, तर मला क्षमा कर’, असे सांगून मनातून त्या साधकाची आणि देवाची क्षमायाचना करत होते.

इ. जेव्हा नातेवाईक अयोग्य वागतांना दिसत होते, तेव्हा देवाला प्रार्थना करून त्यांना साहाय्य करत होते, तसेच ते ऐकण्याच्या स्थितीत असतील, तरच देवाचे साहाय्य घेऊन त्यांना पालटण्याचा प्रयत्न करत होते. नातेवाईक ऐकण्याच्या स्थितीत नसतील, तर स्वतः स्वयंसूचना घेऊन स्थिर रहाण्याचा प्रयत्न करत होते.

ई. नातेवाइकांविषयी माझ्या मनात पूर्वग्रह असेल, तर मी त्यांच्याशी बोलतांना भावाची जोड देत होते; कारण आपल्या शब्दापेक्षा आपली स्पंदने त्यांच्यापर्यंत लगेच पोचतात. त्यामुळे त्यांच्याशी बोलतांना मी भाव आणि प्रार्थना यांचे साहाय्य घेत होते.

३. तिसरा टप्पा – मनाला आध्यात्मिक स्तरावर दिशा देणे

अ. ‘प्रत्येक साधक परात्पर गुरु डॉक्टरांचा सर्वश्रेष्ठ भक्त आहे. त्यांच्या भक्ताविषयी मनात अयोग्य विचार आले, तर देवाला ते आवडेल का ?’, असे मनाला विचारून त्याकडे साक्षीभावाने पाहिले जायचे. त्यामुळे होणारी अयोग्य कृती किंवा विचार थांबत होते.

आ. काही नातेवाईक पुष्कळ त्रासलेले होते. त्यामुळे त्यांना समजून घेण्याची संधी देवाने दिली. त्या वेळी ‘त्यांना देवाच्या चरणाशी जोडण्याची संधी मला मिळाली आहे’, असा भाव ठेवून मी कृती करू लागले. त्यामुळे माझ्या मनात त्यांच्याविषयी प्रेमभाव निर्माण झाला. ‘हे सर्व देवच करवून घेत आहे’, याची जाणीव होती.

४. प्रक्रियेमुळे झालेले लाभ

अ. पूर्वग्रहामुळे येणार्‍या नकारात्मक विचारांचे प्रमाण अल्प होऊन आनंद मिळू लागला.

आ. योग्य कृती केल्यामुळे प्रसंगात अडकण्याचा भाग अल्प झाला आणि प्रसंगातून बाहेर पडता येऊ लागले.

इ. साधक आणि नातेवाईक यांच्याप्रती मनात प्रेमभाव निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांना सहजतेने आध्यात्मिक स्तरावर साहाय्य करते. त्यांच्याकडून घडणारी प्रत्येक कृती सहज स्वीकारता येते. ‘त्यांना साहाय्य करतांना देव नवीन सूत्रे शिकवत असतो’, असे लक्षात आले. मी सहसाधकाला साहाय्य करते, तेव्हा ‘देव माझ्याकडून उजळणी करवून घेत आहे’, असा भाव असतो.

ई. या विचारांत खर्च होणारी मनाची शक्ती वाचली आहे. ‘त्यामुळे देवाला आवडेल, अशी परिपूर्ण सेवा करायची आहे’, या भावाने सेवा करण्याचा प्रयत्न करते.

‘हे भगवंता, माझ्याकडून ही प्रकिया तूच करवून घेतलीस, तरी माझी अल्पसंतुष्टता नष्ट होऊ दे. ‘तुझ्या चरणाशी पूर्णतः एकरूप होईपर्यंत ही प्रक्रिया माझ्याकडून करवून घे’, अशी तुझ्या चरणी कळकळीची प्रार्थना आहे.’

– अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी, अंबरनाथ, ठाणे. (१८.२.२०२०)

  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक