सर्वांशी जवळीक साधणारे आणि राष्ट्र अन् धर्म यांवर प्रेम करणारे लांजा (जिल्हा रत्नागिरी) येथील कै. संतोष सीताराम आग्रे (वय ३८ वर्षे) !

२९.७.२०२१ या दिवशी लांजा (जिल्हा रत्नागिरी) येथील साधक संतोष आग्रे यांचे निधन झाले. ९.८.२०२१ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा १२ वा दिवस आहे. त्या निमित्त नातेवाइक आणि साधक यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कै. संतोष आग्रे

श्री. सीताराम (नाना) आग्रे (वडील, आध्यात्मिक पातळी ६० टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

श्री. सीताराम आग्रे

१. ‘घर आश्रमासारखे व्हावे’, यासाठी प्रयत्नरत असणे

‘संतोषला घराची स्वच्छता करायला आणि सर्व नीटनेटकेपणाने आवरून ठेवायला आवडायचे. ‘देवघरातील देवतांची पूजा करणे, नामजप करणे, घरात स्तोत्रे आणि प.पू. भक्तराज महाराज यांनी रचलेली अन् गायलेली भजने लावणे’, हे तो नियमित करत असे. ‘आपले घर आश्रमासारखे व्हावे’, यासाठी तो प्रयत्नरत असायचा.

२. ‘साधकांना साहाय्य करणे’, ही साधना आणि कर्तव्यही आहे’, असा भाव असणे

साधक आपत्काळाची सिद्धता करत आहेत. ‘त्यांना साहाय्य करणे’, ही आपली साधना आणि कर्तव्यही आहे’, असा त्याचा भाव असायचा. त्यामुळे त्याला त्या सेवेत आनंद मिळत असल्याचे तो सांगायचा.

३. त्याची सनातनच्या तीन गुरूंवर (परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यावर) दृढ श्रद्धा होती.

अशा या लेकराला काळाने आमच्यातून ओढून नेले. ‘तो सूक्ष्मातून श्री गुरुचरणांशी राहू दे. त्याला पुढील गती मिळून तो साधनारत राहू दे’, अशी भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना करतो.

कृतज्ञता !’ (७.८.२०२१)

सौ. आर्या कासकर (बहीण) आणि श्री. आदित्य कासकर (मेहुणे, बहिणीचे यजमान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

सौ. आर्या कासकर
श्री. आदित्य कासकर

१. ‘संतोषकडे साहाय्य मागितल्यावर तो साहाय्याला येणारच’, असा विश्वास त्याचे नातेवाईक, मित्रमंडळी, साधक आणि सनातनचे संत यांना होता.

२. नियोजनबद्धता

कोणतीही सेवा करायची असेल किंवा कुणाकडे साहाय्याला जायचे असेल, तर त्या पूर्वी तो त्या कृतीचा अभ्यास करायचा. ‘तिथे कोणते साहित्य लागणार ? कोण समवेत लागणार ? त्या कृतीला किती वेळ लागणार ?’ इत्यादी विचार करून तो त्याप्रमाणे कृती करायचा.

३. इतरांशी जवळीक साधणे

काही वर्षांपूर्वी संतोष रामनाथी आश्रमात साहित्याच्या खरेदीची सेवा करत होता. ही सेवा करतांना त्याने अनेक विक्रेत्यांना सनातनच्या कार्याशी जोडले. अजूनही ते संतोषची विचारपूस करतात.

४. वरील सर्व सेवा करत असतांना त्याने कुणाकडूनही कसलीच अपेक्षा केली नाही.

५. राष्ट्र आणि धर्म यांच्याप्रती प्रेम असणे

संतोषमध्ये प्रखर राष्ट्रभक्ती होती. ‘हिंदूसंघटन हीच काळाची खरी आवश्यकता आहे’, या संदर्भात त्याच्या मनात काडीचीही शंका नव्हती. जिथे संधी मिळेल, तिथे तो हिंदूसंघटनाच्या आवश्यकतेच्या संदर्भात बोलत असे. त्याच्या वाडीतील समविचारी मुलांच्या समवेत एकत्र बसून तो त्यांच्यामध्ये राष्ट्र आणि धर्म यांच्याप्रतीचे प्रेम अन् निष्ठा जागृत करण्याचा प्रयत्न करायचा.

६. आपत्काळाची पूर्वसिद्धता करणे

त्याने विविध औषधी वनस्पती, फळझाडे आणि पालेभाजी यांची लागवड केली होती. जी आयुर्वेदीय औषधे सुकवून ठेवू शकतो, अशी काही औषधेही त्याने नीट वाळवून डब्यात किंवा बंद पिशवीत साठवून ठेवली आहेत. कोरोना महामारीच्या काळात गुळवेलीसारख्या अतीमहत्त्वाच्या वनस्पतींचा साठा त्याने स्वतःहून आश्रमात पाठवला होता, तसेच भविष्यासाठी त्यांचा साठाही करून ठेवला आहे.

७. आपत्काळाची पूर्वसिद्धता करत असतांना तो भविष्यातील भीषण काळाच्या संदर्भात इतरांचेही प्रबोधन करायचा.’

(७.८.२०२१)


प्रेमभावाने सर्वांना आपलेसे करणारे आणि इतरांना साहाय्य करण्यास तत्पर असणारे कै. संतोष आग्रे !

श्री. अमेय पाटकर, लांजा, जिल्हा रत्नागिरी.

१. बालपणापासूनचा मित्र

‘संतोषदादा हा माझा मित्र आणि भाऊही होता. आम्ही लहानपणापासून एकमेकांना ओळखत होतो. मी शाळेतून आल्यावर दादाच्या समवेत सेवेला जात असे. मी त्याच्या समवेत राहून चारचाकी वाहन चालवायला शिकलो.

२. ‘येणार्‍या आपत्काळात एकमेकांच्या संपर्कात रहाता यावे’, यासाठी त्याने माझी लांजा येथील अनेक जणांशी ओळख करून दिली होती.

३. प्रेमभाव

मी रुग्णाईत असतांना त्याने माझी काळजी घेतली. मी कामावरून दमून आलो की, त्याच्याकडे विश्रांती घेण्यासाठी जात असे. तेव्हा तो माझ्यासाठी जेवण बनवून ठेवायचा. त्याला माझी प्रत्येक आवड-नावड ठाऊक होती. त्याने अल्पावधीतच मला आपलेसे करून घेतले.

४. मी त्याला माझ्याविषयी घडलेला एखादा प्रसंग सांगितल्यावर तो मला समजावून सांगायचा आणि चांगला दृष्टीकोन द्यायचा.

५. त्याची भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अपार श्रद्धा होती. ‘आपण जे काही करतो, ते देवासाठी करतो’, याची जाणीव तो मला सतत करून देत असे.

६. संतोषदादाच्या मृत्यूच्या प्रसंगातून ‘येणार्‍या आपत्काळात स्थिर कसे रहायचे ?’, हे शिकायला मिळणे

मी संतोषदादाच्या आजारपणात त्याच्याजवळ होतो. ‘त्याचे अकस्मात् आमच्यातून निघून जाणे’, हे  स्वीकारणे मला कठीण गेले. या प्रसंगात स्थिर रहाण्यासाठी मला अनेक साधकांनी साहाय्य केले. यातून मला ‘येणार्‍या आपत्काळात स्थिर कसे रहायचे ?’, हे शिकायला मिळाले. त्यामुळे मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.

‘परात्पर गुरु डॉक्टर, तुम्ही मला असा साधक-मित्र दिलात. त्याच्याकडून मला अनेक गुण शिकता आले. ‘ते गुण मला आचरणात आणता येऊ देत’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’ (७.८.२०२१)

श्री. सुरजित माथूर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१. ‘संतोष रुग्णाईत असतांना ‘त्याला त्रास होत आहे’, हे त्याने कधी कुणालाही कळू दिले नाही. तो सर्वांशी प्रेमानेच बोलायचा.

२. शेवटच्या समयीही आनंदी असणे : त्याच्या शेवटच्या समयी त्याला गोव्यात आणण्याचे आटोकाट प्रयत्न करण्यात आले. वाटेतच त्याची प्रकृती बिघडली आणि त्याला पुन्हा रत्नागिरीला नेण्याचे ठरले. त्याला गाडीतून आणतांनाही तो पुष्कळ आनंदी होता.’ (७.८.२०२१)

सौ. वैदेही विक्रम भावे, मोर्डे, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी.

१. सर्वांना आपलेसे करणे

‘संतोषदादा लहान-मोठ्यांमध्ये सहजपणे मिसळत असे आणि सगळ्यांना आपलेसे करत असे. त्यामुळे आमचे अनेक नातेवाइकही त्याला चांगले ओळखतात. तो आमच्या घरातील सदस्य असल्याप्रमाणेच वागत असे.

२. प्रेमभाव

अ. ‘कुठल्या साधकाला कोणता खाऊ आवडतो ?’, हे संतोषदादाच्या लक्षात असायचे. एखाद्या ठिकाणी जातांना तो तेथील साधकासाठी त्याच्या आवडीचा खाऊ घेऊन जात असे. आमच्या घरी येतांनाही तो आम्हाला आवडणारा खाऊ आठवणीने आणत असे.

आ. दादा निर्जीव वस्तूंनाही, उदा. भ्रमणभाष, दुचाकी किंवा चारचाकी गाडी यांनाही प्रेमाने आणि हळूवारपणे हाताळत असे.

इ. दादा घरी आल्यावर आमचा पाळीव कुत्राही आनंदी होत असे; कारण दादा त्याच्यासाठीही काहीतरी खाऊ घेऊन येत असे.

३. इतरांना साहाय्य करण्यास तत्पर असणे

अ. मला एखाद्या गोष्टीत संतोषदादाचे साहाय्य हवे असल्यास मी त्याला दूरभाष करत असे आणि तो लगेच येऊन साहाय्य करत असे. त्याच्याकडे साहाय्य मागितले आणि ते मिळाले नाही, असे कधीच झाले नाही. हा अनुभव माझ्याप्रमाणेच अनेकांनी घेतला आहे.

आ. माझे सासरे पू. विनय भावेकाका यांनी देहत्याग केल्यानंतर मला घरी जावे लागले. त्या वेळी माझे यजमान श्री. विक्रम भावे यांना तातडीने घरी येणे शक्य झाले नाही. तेव्हा संतोषदादा आमच्या घरी माझ्या साहाय्याला राहिला होता. घरातील केर काढण्यापासून भांडी घासण्यापर्यंत सगळ्याच गोष्टींत त्याने मला साहाय्य केले.

इ. दादाने गोव्यातील अनेक साधकांना आपत्काळाच्या दृष्टीने साठा करण्यासाठी रत्नागिरीतून धान्य घेऊन दिले होते.

४. चूक स्वीकारून क्षमा मागणे

दादाला त्याची एखादी चूक सांगितली किंवा ‘एखाद्या प्रसंगातील त्याचे वागणे पटले नाही’, असे त्याला सांगितले, तर तो लगेच क्षमा मागत असे. त्याने त्याविषयी कधीही स्पष्टीकरण दिले नाही. तो ‘त्या प्रसंगात काय अपेक्षित होते ?’, हे लगेच विचारून घेत असे.’

श्री. नीलेश पाध्ये आणि सौ. जानकी पाध्ये, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१. ‘आम्ही वैयक्तिक कामासाठी काही दिवस लांजा येथे गेलो होतो. तेथे आमची संतोषदादाशी भेट झाली. त्याच्यामुळे आमची तेथे रहाण्याची व्यवस्था झाली होती.

२. तो नेहमी त्याच्या घरच्या भाज्या आम्हाला आणून द्यायचा.

३. इतरांना साहाय्य करणे

३ अ. तो स्वतःच्या शारीरिक स्थितीचा विचार न करता आम्हाला नेहमी साहाय्य करायचा.

३ आ. संतोषदादाने ओळख नसलेल्या गरीब व्यक्तीला ८ कि.मी. दूर अंतरावर असलेल्या गावातून औषध आणून देणे : लांजा येथून ८ कि.मी. दूर असणार्‍या ‘माजल’ या गावात एका गरीब लोहार व्यक्तीला औषध आणायचे होते. त्या वेळी संतोषदादा तेथून गाडीवरून जात होता. त्या व्यक्तीने दादाला हाक मारून त्याला स्वतःची स्थिती सांगितली आणि औषध आणून देण्याविषयी विचारले. त्या वेळी त्या व्यक्तीशी ओळख नसतांनाही दादाने ८ कि.मी. दूर लांजा येथे जाऊन तिला औषध आणून दिले. ती व्यक्ती आम्हाला वरील प्रसंग सांगत असतांना भावुक झाली होती. ती आम्हाला म्हणाली, ‘‘आताच्या काळात साहाय्याला धावून येणारी अशी माणसे अल्प आहेत.’’ ती व्यक्ती दादाविषयी पुष्कळ आदराने बोलत होती.’ (७.८.२०२१)

अधिवक्ता रूपेश गांगण, लांजा, जिल्हा रत्नागिरी.

अधिवक्ता रूपेश गांगण

१. ‘माझी संतोषशी पुण्यामध्ये ओळख झाली. तो ६ मास माझ्या खोलीत रहायला होता. त्याचे अक्षर अतिशय सुंदर आणि वळणदार होते.

२. ‘साधना करणे’ हे त्याच्या जीवनाचे ध्येय होते. त्या अनुषंगाने त्याचे विचार आणि कृती असायची.

३. तो व्यवहार आणि अध्यात्म यांची सांगड घालत असे.

‘संतोष रुग्णाईत असतांना मला त्याची सेवा करण्याची संधी मिळाली’, यासाठी मी ईश्वराच्या चरणी कृतज्ञ आहे.’ (७.८.२०२१)