सातारा जिल्ह्यातील कोरोना आणि अतीवृष्टीच्या उपाययोजनांसाठी ११४ कोटी ७५ लाख रुपये निधी !

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीची बैठक

सातारा, ७ ऑगस्ट (वार्ता.) – जिल्हा वार्षिक योजना वर्ष २०२१-२२ मधील संमत निधीच्या ३० टक्के निधी कोरोना उपाययोजनांसाठी आणि ५ टक्के निधी हा अतीवृष्टी उपाययोजनांसाठी राखून ठेवण्यास पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी मान्यता दिली.

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या बैठकीत हा निधी संमत करण्यात आला. बैठकीत वित्त आणि नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्ह्यातील आमदार आणि विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

वर्ष २०२१-२२ साठी एकूण ३७५ कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पीत आहे. यातून कोरोना उपाययोजनांसाठी ९८ कोटी ३ लाख २ सहस्र रुपये, अतीवृष्टीच्या उपायोजनांसाठी १६ कोटी ७२ लाख ५० सहस्र निधी पुनर्विनियोजित करण्यात आला आहे, तसेच कराड तालुक्यातील मसूर येथील आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धनाने ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या मान्यतेने प्रस्ताव आरोग्य संचालनालयास पाठवण्यासाठी मान्यता देण्यात आली.

या बैठकीत सातारा तालुक्यातील नागठाणे येथील चौंडेश्‍वरी देवस्थान, माण तालुक्यातील मलवडी येथील श्रीमल्हारी-म्हाळसाकांत देवस्थान आणि कराड तालुक्यातील गमेवाडी येथील गोरक्षनाथ देवस्थान या ३ देवस्थानांना क तिर्थक्षेत्र वर्ग (दर्जा) मिळण्याच्या प्रस्तावास जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिली आहे.