आळंदी येथे पालखी सोहळ्याची सांगता !

प्रातिनिधिक छायाचित्र

आळंदी – विठू माऊलीच्या नामाचा गजर आणि टाळ मृदुंगाच्या निनादात माऊलींच्या प्रस्थान वारी सोहळ्याची सांगता चल पादुकांच्या मंदिर प्रदक्षिणेने दिंड्यांच्या उपस्थितीत झाली. २ जुलै या दिवशी चल पादुकांचे प्रस्थान झाल्यानंतर त्या पादुका १७ दिवसांसाठी आजोळघरी विसावल्या होत्या. आषाढी एकादशी आणि गोपाळकाला करून पंढरपुरातून परतलेल्या पालख्या कारंजेमंडपात विसावल्या होत्या. ३ ऑगस्ट या दिवशी पालखी सोहळ्याचे प्रमुख राजाभाऊ आरफळकर यांनी माऊलींच्या पादुका समाधीसमोर स्थानापन्न केल्या. कामिका एकादशीनिमित्त दिंड्यांच्या उपस्थितीत चल पादुकांची मंदिर प्रदक्षिणा करून आणि मानकर्‍यांना नारळ देऊन आषाढी सोहळ्याची सांगता झाली. या वेळी आळंदी देवस्थानचे सोहळाप्रमुख अधिवक्ता विकास ढगे, प्रमुख विश्‍वस्त डॉ. अभय टिळक, पालखी सोहळ्याचे मालक आणि व्यवस्थापक उपस्थित होते.