अधिवक्ता रामदास केसरकरकाका मुंबई येथील उच्च न्यायालय आणि ठाणे येथील जिल्हा न्यायालय येथे वकिली व्यवसाय करत होते. साधारणतः २७ वर्षांपूर्वी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अभ्यासवर्गांच्या माध्यमातून त्यांचा सनातन संस्थेशी संपर्क झाला आणि त्यांना मानवी जीवनातील साधनेचे महत्त्व समजले. त्यानंतर त्यांनी आणि त्यांच्या पत्नी सौ. प्रमिला केसरकरकाकू यांनी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केला. मागील १५ वर्षांपासून केसरकरकाका त्यांच्या पत्नीसह सनातन संस्थेच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करत आहेत. साधारणतः ६ वर्षांपूर्वी केसरकरकाकूंना कर्करोग झाल्याचे निदान झाले. तेव्हापासून काकू देहप्रारब्ध सोसत आहेत, तर काका काकूंची सर्व सेवा न थकता आणि न कंटाळता करत आहेत. व्याधीने गांजलेल्यांची सेवा करतांना तरुण वयातील व्यक्तीही कंटाळून जातात; पण काका उतारवयात (वय ६८ वर्षे) रुग्णाईत पत्नीची सेवा आनंदाने करत आहेत. ते पत्नीला आनंद देण्यासाठी धडपडत आहेत. ते कुठलेही गार्हाणे न करता या परिस्थितीला आनंदाने सामोरे जात आहेत.
गुरुमाऊलीच्या छत्रछायेखाली राहिल्यामुळे त्या दोघांनाही हे प्रारब्ध भोगणे सुसह्य होत आहे. सौ. प्रमिला केसरकर यांनी या असाध्य व्याधीशी झुंजत ६६ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे, तर अधिवक्ता केसरकरकाकांनी काकूंची मनोभावे सेवा केल्यामुळे त्यांची साधना होऊन त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे. अशा प्रकारे ते दोघेही गुरुकृपेने जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाले आहेत.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अधिवक्ता रामदास केसरकरकाका आणि सौ. प्रमिला केसरकरकाकू यांच्याशी भेट झाली. त्या वेळी त्यांच्यामध्ये झालेला भावस्पर्शी संवाद पुढे दिला आहे.
(भाग २)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/500469.html
८. ‘साधना करून प्रगती झाल्यामुळे मनुष्यजन्माचे सार्थक झाले’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काकूंना सांगणे
परात्पर गुरु डॉ. आठवले : काही मासांपूर्वी तुम्ही मला एक-दोनदा दिसला होता.
(अधिवक्ता रामदास केसरकर आणि सौ. प्रमिला केसरकर दोघेही हसतात.)
परात्पर गुरु डॉ. आठवले : कशा आहेत बघूया ! झाले समाधान. सर्व छान आहे. साधनेतील प्रगतीही चांगली आहे. आणखी काय पाहिजे आपल्याला ? जन्माचे सार्थक झाले.
सौ. प्रमिला केसरकर : खरे आहे.
९. ‘सध्या कुणाचीच काळजी करत नाही’, असे काकूंनी सांगणे
परात्पर गुरु डॉ. आठवले : ‘तुम्ही गेल्यावर यांच्याकडे (केसरकरकाकांकडे) कोण बघेल ?’, याची काळजी करत नाही ना ?
सौ. प्रमिला केसरकर : सध्या कुणाचीच काळजी करत नाही.
परात्पर गुरु डॉ. आठवले : कुणाचीच काळजी करत नाहीत. स्वतःचीही काळजी करत नाहीत. छान !
१०. ‘निर्विचार’ हा नामजप केल्यामुळे मन निर्विचार झाले की, वेदना जाणवणार नाहीत’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काकूंना सांगणे
सौ. प्रमिला केसरकर : दिवसभर मला असह्य दुखते. रात्रीची झोप लागत नाही.
परात्पर गुरु डॉ. आठवले : तुम्ही नामजप कुठला करता ?
सौ. प्रमिला केसरकर : निर्विचार.
परात्पर गुरु डॉ. आठवले : ‘निर्विचार’ हाच नामजप चालू ठेवायचा. या नामजपाने मन हळूहळू निर्विचार झाले की, वेदना जाणवणार नाहीत.
सौ. प्रमिला केसरकर : हो.
११. ‘निर्विचार’ या नामजपामुळे साधकांना देवतांच्या नामजपांइतकाच; किंबहुना त्यांपेक्षाही अधिक लाभ होत असल्याचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगणे आणि काका अन् काकू या दोघांचाही ‘निर्विचार’ हा जप अखंड होत असणे
परात्पर गुरु डॉ. आठवले : ‘निर्विचार’ या नामजपाचे आपण संशोधन केले आहे. निरनिराळ्या देवतांचा नामजप असतो. साधकांना देवतांच्या नामजपांइतकाच किंवा त्यांपेक्षाही अधिक लाभ ‘निर्विचार’ या जपाने होत आहे. ‘निर्विचार’ हा नामजप निर्गुण आहे. देवतांचे नामजप सगुण आहेत.
अधिवक्ता रामदास केसरकर : दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये याविषयी प्रसिद्ध झाले होते. ते वाचून हा नामजप चालू केला. तेव्हापासून माझा ‘निर्विचार’ हा नामजप अखंड चालू झाला.
परात्पर गुरु डॉ. आठवले : त्यांचा (काकूंचा) कि (काकांना उद्देशून) तुमचा ?
अधिवक्ता रामदास केसरकर : दोघांचाही.
परात्पर गुरु डॉ. आठवले : दैनिकात आपण लेख लिहितो, त्याचा लाभ होत आहे. कुणीतरी वाचून त्याचा लाभ करून घेत आहेत.
१२. ‘काकांनी तुमची सेवा केल्यामुळे तुमचा त्रास न्यून होतो आणि या सेवेतून काकांची साधना झाल्याने त्यांना शक्ती मिळते’, असे परात्पर गुरु डॉक्टरांनी काकूंना सांगणे
परात्पर गुरु डॉ. आठवले (काकूंना उद्देशून) : पूर्वी हे (काका) अधिवक्ता होते. आता ते सेवक झाले आहेत; कारण ते तुमची सेवा करतात. ‘साधकांनी सेवा करणे आणि बाहेरून आलेल्या परिचारिकेने सेवा करणे’, यांत पुष्कळ अंतर आहे. (केसरकरकाकांना उद्देशून) तुम्ही काकूंची सेवा केल्यामुळे काकूंचा त्रास न्यून होतो आणि या सेवेतून तुमची साधना झाल्यामुळे तुम्हालाही शक्ती मिळते. दोघांनाही याचा लाभ होतो. प.पू. भक्तराज महाराज म्हणायचे, ‘सापडलो एकमेकां । जन्मोजन्मी नोहे सुटका ।।’ (हा संत नामदेव महाराज यांनी रचलेला अभंग आहे.)
अधिवक्ता रामदास केसरकर : हो.
१३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काका-काकूंजवळ त्यांच्या मुलींची विचारपूस करणे
परात्पर गुरु डॉ. आठवले : मुली कशा आहेत ?
अधिवक्ता रामदास केसरकर : दोघीही आनंदात आहेत.
परात्पर गुरु डॉ. आठवले : मोठी मुलगी (सौ. साक्षी नाईक) इथेच (गोव्यातच) आहे. लहान मुलगी (कु. उमा केसरकर) कुठे आहे ?
अधिवक्ता रामदास केसरकर : ठाण्याला. आपल्या कृपेने आनंदात आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले : एकटीच आहे. तिने लग्न केले नाही का ?
अधिवक्ता रामदास केसरकर : लग्न केले नाही. ती ‘एकटा जीव, सदाशिव’ बरा आहे’, असे म्हणते.
परात्पर गुरु डॉ. आठवले : देवाकडे जायला पाहिजे. साधनेत पुढे जायला पाहिजे. एकटीने साधना कशी होणार ? म्हणून आपण सर्व जण आश्रमात रहातो. येथे साधक आपल्या चुका सांगतात. साधकांच्या सत्संगामुळे सात्त्विकता मिळते. एकटीला काय मिळणार ? मला वाटले, ‘मोठ्या मुलीपेक्षा ती चांगली आहे. ती ऐकते’; पण उलटच झाले. ‘आपल्याला काही कळत नाही’, हे यातून सिद्ध झाले; पण ती कंटाळली नाही का ?
अधिवक्ता रामदास केसरकर : नाही.
१४. काकूंनी ‘आज्ञापालन म्हणून ‘निर्विचार’ हा नामजप करते’, असे सांगणे आणि ‘आपल्यासाठी महर्लाेक म्हणजे मोक्षच आहे’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगणे
परात्पर गुरु डॉ. आठवले : तुम्ही नामजप करता. तो स्वतःसाठी करता कि समष्टीसाठीही करता ?
सौ. प्रमिला केसरकर : मी आज्ञापालन म्हणून करते.
परात्पर गुरु डॉ. आठवले : जो होईल, तो नामजप आपण करायचा.
सौ. प्रमिला केसरकर : मला सद्गुरु गाडगीळकाकांनी पायावरील सूज उतरण्यासाठी १ – २ नामजप दिले आहेत. ते करते. इतर वेळी ‘निर्विचार’ हा नामजप करते.
अधिवक्ता रामदास केसरकर : दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘निर्विचार’ हा नामजप दिला आहे. तो जप ती आज्ञापालन म्हणून करते. त्यात ‘जलद मोक्षप्राप्तीसाठी हा जप आहे’, असे दिले आहे ना !
परात्पर गुरु डॉ. आठवले : आपल्यासाठी महर्लाेक म्हणजे मोक्षच ! पृथ्वीवर पुन्हा यायचे नाही.’
– अधिवक्ता रामदास केसरकर (सनातनचे कायदेविषयक मानद सल्लागार), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(२६.७.२०२१)
(क्रमशः)