वर्ष २०२० मध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी औंध (जिल्हा पुणे) येथील साधकांना आलेल्या अनुभूती !

सौ. मनीषा प्रदीप साठ्ये

१. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदाताई गुरुपूजन करत असतांना ‘स्वतःही तिथेच असून सर्वकाही जवळून बघत आहे’, असे जाणवणे आणि आरती करतांना परात्पर गुरुदेवांचे अस्तित्व जाणवणे : ‘५.७.२०२० या दिवशी, म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळपासूनच माहितीजाल (इंटरनेट) नीट चालत नव्हते; म्हणून मी सद्गुरूंना पुष्कळ शरण जाऊन प्रार्थना केल्या. नंतर मला कार्यक्रम नीट बघता आला. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदाताई गुरुपूजन करत असतांना ‘मीही तिथेच असून सर्वकाही जवळून बघत आहे’, असे मला जाणवत होते. गुरुपूजन होईपर्यंत सतत भावाश्रू येत होते. आरती चालू झाल्यावर मीही भ्रमणसंगणकाच्या समोर उभे राहून परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्राला ओवाळले. त्या वेळी ‘गुरुदेव माझ्या घरी आले असून मी त्यांना ओवाळत आहे’, असे वाटत होते.

२. सायंकाळी कार्यक्रम बघता न आल्याने पुष्कळ वाईट वाटणे आणि २ दिवसांनी तो पुन्हा पहाता येणे अन् परात्पर गुरुदेवांनी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेविषयी सांगूनही ती गांभीर्याने न राबवल्याविषयी खंत वाटणे : संध्याकाळी ७ वाजता शाळेतील आवश्यक कामामुळे मला कार्यक्रम नीट बघता येत नव्हता. त्यामुळे मला पुष्कळ वाईट वाटत होते. ७.७.२०२० या दिवशी तोच कार्यक्रम पुन्हा प्रक्षेपित झाल्याने माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. परात्पर गुरुदेव (परात्पर गुरुदेव डॉक्टर आठवले) जिज्ञासूंना मार्गदर्शन करत असल्याचे पाहिले. तेव्हा मला फार खंत वाटली की, गुरुदेवांनी किती आधीच आम्हा सर्व साधकांना स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेविषयी सांगितले आहे; पण मी अजूनही ती गांभीर्याने राबवलेली नाही. आता मी प्रक्रिया आणि त्यांनी सांगितलेली सर्व साधना पूर्ण करणार आहे.’


कु. शोभना आवटे

१. गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरातील सर्वांनी पूजेच्या सिद्धतेत सहभाग घेणे : ‘गुरुपौर्णिमेच्या मंगलमय दिनी मला पहाटे ३.०० वाजता जाग आल्याने माझी व्यष्टी साधना लवकर पूर्ण झाली. तेव्हा मला पुष्कळ आनंद होत होता. मन अत्यंत स्थिर होते. मी दळणवळण बंदीच्या काळात गावाला माझ्या भावाकडे होते. ‘इथे गुरुपूजनासाठी सर्व साहित्य मिळेल का ?’, असा विचार मनात आला; पण गुरुकृपेने सर्वकाही मिळाले. तोरण बनवण्यासाठी आंब्याची पाने मिळाली. तसेच तुळशीची पाने, मोगरा, जास्वंद आणि गुलाब ही फुलेही मिळाली. मी नामजप करत हार केले. घरातील सर्वांनी सहकार्य केले. कुणी तोरण बांधले, कुणी गुरुतत्त्वाची रांगोळी काढली, तर कुणी नैवेद्य बनवला. कुणीतरी चौरंग आणून दिला. घरच्यांनाही ‘घरात मंगलमय सोहळा आहे’, असे जाणवत होते.

२. आरती झाल्यावर प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांच्या छायाचित्राला वाहिलेले गुलाबाचे फूल खाली पडणे, तेव्हा ‘प.पू. बाबांचा आशीर्वादच मिळाला आहे’, असे वाटणे : गुरुपूजन झाल्यावर घरातील सर्वांनी एकत्रितपणे सद्गुरूंची भावपूर्ण आरती केली. ती झाल्यावर प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राला वाहिलेले गुलाबाचे फूल खाली पडले. तेव्हा मला ‘प.पू. बाबांचा आशीर्वादच मिळाला आहे’, असे वाटले आणि आनंद झाला. ‘प.पू. गुरुदेव छायाचित्रातून आपल्याकडे पाहून हसत आहेत’, असे जाणवले. ‘घरात गुरुतत्त्व भरून राहिले आहे’, असे जाणवत होते.

३. ग्रामीण भागात वीज केव्हाही जाते; पण गुरुकृपेने दोन्ही कार्यक्रम व्यवस्थित पहाता येणे : ग्रामीण भाग असल्यामुळे तेथे वीज केव्हाही जाते; पण गुरुकृपेने दोन्ही वेळचे कार्यक्रम कोणतीही अडचण न येता पहाता आले. दुपारी धर्मप्रेमी, जिज्ञासू आणि नातेवाईक यांना संध्याकाळचा गुरुपौर्णिमा कार्यक्रम पहाण्याची आठवण केली. या दिवशी परात्पर गुरुदेवांचे दर्शन झाल्याने मला कृतकृत्य झाल्यासारखे वाटले. दळणवळण बंदीच्या काळात असा भावमय सोहळा अनुभवता आला, त्याविषयी गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता.’


श्रीमती शकुंतला पारतवार

१. परात्पर गुरुदेवांनी व्यष्टी-समष्टी साधनेचे अनेक पैलू शिकवून ते कृतीत आणून घेणे : ‘या वर्षी परात्पर गुरुदेवांनी गुरुपौर्णिमेनिमित्त व्यष्टी-समष्टी साधनेचे अनेक पैलू शिकवले आणि ते कृतीत आणून घेतले. ‘ऑनलाईन’ सत्संग आणि दैनिक ‘सनातन प्रभात’ हे ‘व्हाट्सॲप’च्या माध्यमातून कसे पाठवायचे ?, सत्संग ऐकणे, ‘ऑनलाईन’ अर्पण सेवा कशी करायची ?, हे सर्व गुरुदेवांनी शिकवले. हे शिकतांना आनंद आणि उत्साह जाणवत होता. सेवा करतांना नवीन लोकांच्या ओळखी झाल्या. त्यांनीसुद्धा ‘ऑनलाईन’ सत्संग पोस्ट आणि दैनिक पुढे पाठवण्यासाठी प्रयत्न केले. त्यातून त्यांनाही आनंद मिळाला. हे सर्व केवळ गुरुदेवांच्या कृपेमुळेच शक्य होऊ शकले.

व्यष्टी साधना करतांना स्वभावदोष आणि अहं यांची जाणीव अंतर्मनातून झाली. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या संकल्पाने व्यष्टी साधना होत आहे. प्रतिदिन ‘गुरुलीला’ सत्संगातून गुरुदेवांनी ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मनीषा पाठक यांच्या माध्यमातून ‘अंतर्मन शुद्ध, निर्मळ आणि पवित्र करण्यासाठी कसे प्रयत्न करायचे ?’, हे शिकवले.

२. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुदेवांचे दर्शन झाल्यामुळे दिवसभर भाव जागृत असणे : गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुदेवांनी तत्त्वरूपात अनुभूती दिल्याने आनंद वाटत होता. गुरुदेवांनी सकाळी लवकर उठून नामजप करून घेतला आणि चैतन्यशक्ती दिली. त्यामुळे उत्साह जाणवून पूर्ण शरीर हलके वाटत होते आणि सतत कृतज्ञता व्यक्त होत होती. गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांनी दर्शन दिल्यामुळे दिवसभर माझा भाव जागृत होत होता. ‘आता केवळ गुरुदेव आणि मी. बस बाकी काही नको’, अशी स्थिती झाली होती. ‘गुरुदेव, आपणच हे सुचवलेत आणि लिहून घेतलेत, त्याविषयी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता.’ (जुलै २०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक