सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा निलंबित करण्यात आलेला एक स्वच्छता कर्मचारी पुन्हा सेवेत

सिंधुदुर्ग – जिल्हा परिषदेच्या स्वच्छता कर्मचारी भरती प्रक्रियेत लाड-पागे समितीच्या शिफारसी डावलून भरती करण्यात आलेल्या ६ कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले होते. त्यांपैकी एका कर्मचार्‍याला सहानुभूती दाखवत पुन्हा जिल्हा परिषदेच्या सेवेत घेण्यात आले आहे.

लाड-पागे समितीने केलेल्या शिफारसीप्रमाणे जिल्हा परिषदेच्या वतीने स्वच्छता कर्मचार्‍यांच्या वारसांना त्यांनी नामनिर्देशित केलेल्या व्यक्तींना नियुक्ती द्यायची असते, असे असतांना चुकीची प्रक्रिया राबवून नियमबाह्य पद्धतीने वेगळ्याच व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली होती. याविषयी मनसेने आवाज उठवत योग्य त्या लाभार्थ्यांची नियुक्ती व्हावी अन् या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार कोकण विभागीय आयुक्तांनी केलेल्या चौकशीत प्रथमदर्शनी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी दोषी आढळून आले होते. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांनी कोकण आयुक्तांच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेतील ५ अधिकारी आणि नियुक्ती मिळालेले ६ कर्मचारी यांना निलंबित केले होते.