८ कोटी जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न !
राज्यातील अनेक भागांत पूरस्थिती असतांना पदविकाधारक पशूवैद्यक संपावर जाणे, हे धोक्याचे आहे. त्यामुळे सरकारने हा प्रश्न तात्काळ सोडवण्यासाठी पावले उचलली पाहिजेत.
नागपूर –‘पदवीधर पशूवैद्यकांप्रमाणेच जनावरांवर उपचार करण्याचे अधिकार मिळावेत’, या प्रमुख मागणीसाठी ‘नियमानुसार काम’ आंदोलन करणार्या राज्यभरातील सर्व पदविकाधारक पशूवैद्यक १ ऑगस्टपासून ‘बेमुदत संपा’वर गेले आहेत. त्यामुळे राज्यभरातील अनुमाने ८ कोटी पशूंच्या चिकित्सेवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
सध्या राज्यातील ग्रामीण भागांत पदविकाप्राप्त वैद्यच पशूचिकित्सेचे काम करत आहेत. सरकारच्या अनेक चिकित्सालयांमध्ये प्रमुख हे पदविकाधारक पशूवैद्यक आहेत; मात्र त्यांना नियमाप्रमाणे पदवीधर पशूवैद्यकांच्या मार्गदर्शनाखाली काम करावे लागते आणि त्यांच्या उपदेशाने उपचाराचे अधिकार आहेत. अनेक वर्षांपासून सर्व प्रकारचे उपचार करत असतांनाही सरकारने त्यांना पूर्ण उपचारांचे अधिकार बहाल केले नाहीत. ते मिळावेत म्हणून त्यांचे जूनपासून आंदोलन चालू आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास १ ऑगस्टपासून ‘बेमुदत संपा’वर जाऊ, अशी चेतावणी पशूचिकित्सा व्यवसायी संघटनेने यापूर्वीच दिली होती; मात्र सरकारने त्याची नोंद घेतली नाही. ‘पदविका आधुनिक वैद्यक पंचायत समिती किंवा पशूचिकित्सालय कार्यालय यांपुढे धरणे आंदोलन करतील’, असे या संघटनेचे राज्य अध्यक्ष सुनील काटकर यांनी सांगितले.