‘मेट्रो’मुळे पुण्याला आधुनिक ओळख मिळणार ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे मेट्रो च्या विकास कामाची पाहणी करतांना

पुणे, १ ऑगस्ट – येथील वनाज ते आयडियल कॉलनी या मेट्रो टप्प्याची चाचणी करण्यात आली. या ऐतिहासिक नगरीचा आधुनिक इतिहास लिहितांना पुणे मेट्रो रेल्वेचे काम आणि तांत्रिक चाचणी यांचा (‘ट्रायल रन’चा) उल्लेख करावा लागेल. ‘मेट्रो’मुळे पुण्याला नवी आणि आधुनिक ओळख मिळणार आहे. पुण्याच्या विकासाचे आणखी एक स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर येऊन पोचले आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री, अजित पवार यांनी ३० जुलै या दिवशी केले. पुणे मेट्रोने उर्वरित कामे जलदगतीने पूर्ण करावीत, कोणत्याही परिस्थितीत मेट्रोच्या कामासाठी निधी अल्प पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले.

१. पुणे मेट्रोमुळे रस्त्यांवरील वाहने, वाहतूक आणि प्रदूषण यांचा ताण न्यून होईल. त्यातून वाहतुकीची कोंडी सुटण्यास साहाय्य होईल.

२. वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गिकेअंतर्गत वनाज ते गरवारे महाविद्यालय या मेट्रो मार्गिकेची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. एकूण ५ कि.मी. लांबीचा हा टप्पा आहे. या मार्गावर मेट्रोने यापूर्वीही सरावपूर्व चाचणी घेतली होती.

३. ऑक्टोबर अखेरपर्यंत वनाज ते रामवाडी या मार्गिकेचा काही भाग चालू करण्याचा सत्ताधारी पक्षाचा आग्रह आहे.

४. दळणवळण बंदी असतांनाही महामेट्रोने या मार्गावरील कामे वेगाने चालूच ठेवली होती. वनाज ते रामवाडी या मेट्रोच्या मार्गिकेवर मेट्रो धावण्याची चाचणी घेण्यासही प्राधान्य देण्यात आले होते.

५. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट ही मेट्रोची मार्गिका शेतकी महाविद्यालयापर्यंत उन्नत आणि तेथून पुढे स्वारगेटपर्यंत भूमीगत आहे. भूमीगत मेट्रो मार्गिकेचे कामही वेगात चालू आहे.

६. नदीपात्राखालूनही महामेट्रोने भूमीगत मार्गिकेसाठी बोगदा निर्मिती करण्याचा आव्हानात्मक टप्पा पूर्ण केला आहे.