१. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर चीनने माऊंट एव्हरेस्टवर रेषा आखण्याची घोषणा करणे आणि नेपाळ पूर्णपणे चीनवर अवलंबून असल्याने त्याच्या मनमानीला थांबवण्याचे धाडस नेपाळमध्ये नसणे
‘चीनने हिमालयावरील सर्वांत उंच शिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्टवर एक रेषा आखण्याचे नुकतेच घोषित केले. भारत आणि नेपाळ या देशांत चिनी विषाणूची महामारी पसरली आहे. त्या पार्श्वभूमीवर चीनने ही घोषणा केली. त्यामुळे दुसर्या देशांच्या गिर्यारोहकांना चढाई करण्यासाठी अनुमती मिळणार नाही. ही रेषा तिबेटचे गिर्यारोहक येऊन आखणार आहेत. हे शिखर नेपाळच्या हद्दीत आहे. त्यामुळे तेथे केवळ नेपाळच रेषा आखू शकतो. तो हक्क कुठल्याही देशाला नाही. सध्या नेपाळ संपूर्णपणे चीनवर अवलंबून आहे. त्यामुळे चीनच्या या मनमानीला थांबवण्याचे त्याच्यात धाडस नाही. माऊंट एव्हरेस्टवर चढाई करायची असेल, तर दोन बाजूंनी रस्ते आहेत. एक चीनच्या बाजूने, तर दुसरा नेपाळच्या बाजूने रस्ता आहे.
२. चीनने जगातील विविध देशांवर दादागिरी करून धमकीही देणे
चिनी विषाणू पसरवण्याला जो देश उत्तरदायी आहे, तोच देश सध्या जगावर दादागिरी करत आहे. चीन पैशांच्या सामर्थ्यावर सर्वच देशांशी अशा पद्धतीने वागत आहे. काही दिवसांपूर्वी चीनने भूतानच्या हद्दीत एक गाव वसवले; पण भूतान काहीही करू शकला नाही. चीनच्या राजदूतांनी बांगलादेशला धमकी दिली की, बांगलादेशने ‘क्वाड्रिलॅटरल को-ऑपरेशन’मध्ये (चार देशांनी एकत्र येऊन युद्धाभ्यास करणे) सहभागी होऊ नये. बांगलादेशाने हे ऐकले नाही, तर त्याचे आणि चीनचे संबंध बिघडतील. चीन म्यानमारच्या जुलमी सरकारला साहाय्य करत आहे. चीनने दक्षिण चिनी समुद्रामध्ये फिलीपिन्सच्या बेटांवर घुसखोरी केलेली आहे. तेथून तो परत जाण्यास सिद्ध नाही. प्रत्येक आठवड्याला चिनी विमाने तैवानच्या हद्दीत प्रवेश करतात. एवढेच नाही, तर युरोप-अमेरिका यांवरही चीन दादागिरी करतो. ‘तुम्ही आमच्याशी चांगले वागला नाहीत, तर तुमच्याशी व्यापार थांबवू’, अशी धमकी त्याने ऑस्ट्रेलियालाही दिली आहे.
३. चीनमुळे त्रस्त झालेल्या देशांचे भारताने संघटन करून त्यांना चीनच्या विरोधात उभे केल्यास चीनची दादागिरी थांबेल !
चीनने भारतासह संपूर्ण जगाच्या विरोधात कोरोनाच्या माध्यमातून जैविक महायुद्ध चालू केले आहे. त्यामुळे कुणाची किती हानी होईल, हे कुणीही सांगू शकत नाही. भारताने पुढाकार घेऊन चीनमुळे त्रस्त झालेल्या राष्ट्रांचे संघटन करून त्यांना चीनच्या विरोधात उभे करायला पाहिजे. जागतिक स्तरावर, म्हणजे संयुक्त राष्ट्रे किंवा अन्य ठिकाणी प्रस्ताव ठेवावा. ‘वुहानमधून निघालेल्या या कोरोना विषाणूला ‘चिनी विषाणू’ हे नाव द्यावे. या विषाणूमुळे भारत आणि जग यांची झालेली हानीभरपाई चीनकडून वसूल करण्यात यावी’, अशी मागणी करावी. यासाठी भारतातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येणे आवश्यक आहे. तसे झाले, तरच चीनला कळेल की, संपूर्ण भारत आणि जग त्याच्या विरोधात गेले आहे. तेव्हाच त्याची दादागिरी थांबेल आणि एक चांगला देश म्हणून पुढे येईल.’
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.