परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मुलीच्या विवाह सोहळ्याच्या वेळी भावाच्या स्तरावर प्रयत्न करवून घेतल्याने सौ. राधा सोनवणे यांनी गुरुचरणी व्यक्त केलेली कृतज्ञता !

‘माझ्या मुलीचा विवाह ठरल्यापासून प्रत्येक वेळी गुरुदेव साहाय्य करत आहेत’, अशा अनुभूती येत असत. त्यांनी करवून घेतलेल्या प्रयत्नांमुळे मुलीचा विवाह सोहळा सात्त्विक वातावरणात साजरा झाल्याचे उपस्थितांना जाणवले. त्यासाठी गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करत आहे.

सौ. राधा सोनवणे

१. लग्नाची सिद्धता करतांना गुरुपौर्णिमेची सिद्धता करत असल्याचा भाव ठेवणे

परात्पर गुरु डॉक्टरांनी मला साधनेत आल्यापासून अनेक सेवांच्या आयोजनाची सेवा शिकवल्यामुळे ‘विवाहकार्यातील प्रत्येक गोष्टीची सिद्धता करतांना गुरुपौर्णिमेची सिद्धता करत आहे’, असा भाव मनात निर्माण होत होता. त्या वेळी ‘गुरुदेवच प्रत्येक कृती करवून घेत आहेत’, असे मला जाणवत होते.

आम्ही प्रत्येक पिशवीवर त्यात ठेवलेल्या वस्तूंची नावे लिहिले. ‘एखादी वस्तू हवी असल्यास ती लगेच सापडावी’, या दृष्टीने घरातील सर्व जण त्या पद्धतीने नियोजन करत होते. ‘एखादी वस्तू घरी राहिल्याने धावपळ झाली अथवा ती वस्तू न्यून पडली’, असे कुठे झाले नाही. त्यामुळे विवाहामध्ये कोणत्याच गोष्टीची उणीव राहिली नाही. आम्ही नियोजन केल्याने विवाहातील सात्त्विकता टिकून ठेवण्यासाठी साहाय्य झाले.

२. विवाहाच्या पूर्वी आणि विधीच्या वेळी प्रत्येक कृतीला भावाची जोड दिल्याने चैतन्य अनुभवता येऊन परात्पर गुरु डॉक्टरांप्रती कृतज्ञता वाटणे

अ. विवाहाच्या विधींच्या वेळी नेसायच्या माझ्या आणि वधूच्या साड्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये भारित करण्यासाठी ठेवल्यामुळे त्या साड्या नेसल्यानंतर आम्हाला त्यातील चैतन्य आणि सात्त्विकता मिळाली. मला त्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.

आ. मुलीच्या विवाहाच्या दिवशी मंगलाष्टके झाल्यानंतर पुढील विधी चालू होण्यापूर्वी मी मुलाच्या (शशांकच्या) साहाय्याने व्यासपिठाची स्वच्छता करून घेतली. त्यामुळे तेथील सात्त्विकता टिकून ठेवण्यासाठी देवाने प्रयत्न करवून घेतले.

इ. ‘रामनाथी आश्रमात जसे शांतपणे आणि विधीवत विवाह सोहळा होतो, तसे येथे होईल का ?’, असा विचार माझ्या मनात होता. ‘गुरुदेव मनातील सर्व इच्छा पूर्ण करतात’, हे मला अनुभवता आले. वधूने वराला हार घालतांना काही जण वराला उचलण्याचा प्रयत्न करत होते. त्या वेळी मी शांतपणे प्रार्थना करून त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी पुरोहितांनीही त्यांना समजावले. त्यामुळे वधू आणि वर यांना उचलणे टाळले गेले अन् विवाह शांततेने आणि निर्विघ्नपणे पार पडला.

ई. कन्यादानाचे विधी चालू असतांना मी ‘वराच्या ठिकाणी श्रीविष्णु आहे’, असा भाव ठेवला. त्या वेळी ‘कृती करतांना भाव ठेवल्याने देव भावाच्या स्तरावर ते कार्य करवून घेतो’, हे प.पू. गुरुदेवांनी शिकवल्याचे स्मरण होऊन माझी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त झाली.

उ. विवाहाला आलेली प्रत्येक व्यक्ती ‘कुठे गोंधळ, स्पीकरचा किंवा अन्य आवाज नव्हता आणि विवाह अतिशय सुंदर झाला’, असे सांगून कौतुक करत होती. त्या वेळी ‘गुरुदेवांचे कौतुक होत आहे’, या विचारामुळे मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.

गुरुदेवांनी हे सर्व शिकवले. त्यांनीच माझ्याकडून करवूनही घेतले. अशा अद्वितीय गुरुमाऊलीच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. राधा सोनवणे, सिंहगड रस्ता, पुणे. (१६.३.२०२१)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक