पूरग्रस्तांना २ कोटी ५० लाख रुपयांच्या साहित्यांचे वाटप करण्यात येणार ! – शरद पवार

अन्य नेत्यांना दौरे टाळण्याचे आवाहन

मुंबई – ‘राज्यात अतीवृष्टीमुळे दरडी कोसळल्याने आणि नद्यांना महापूर आल्याने अनेकांचे प्रापंचिक साहित्य नष्ट झाले आहे. येत्या २ दिवसांत २ कोटी ५० लाख रुपयांचे साहाय्य गरजू लोकांना पोचवणार आहे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने २५० आधुनिक वैद्यांचे पथक सिद्ध करण्यात आले आहे. हे पथक विविध संकटग्रस्त भागांमध्ये जाऊन सेवा देईल, तसेच ‘मास्क’चेही वाटप केले जाणार आहे. जेथे हानी झाली असेल, तेथील लोकांना तातडीने ‘किट’चे (अत्यावश्यक साहित्याचे) वाटप केले जाणार आहे. पूर आणि संकट परिस्थितीमध्ये राजकीय नेत्यांनी दौरे टाळावेत’, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी २७ जुलै या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.

‘राष्ट्रवादी काँग्रेस वेल्फेअर ट्रस्ट’च्या माध्यमातून १६ सहस्र ‘किट’चे वाटप करणार !

महाराष्ट्राला महापुराचा फटका बसला आहे. पुरामुळे घरांसह शेतीचीही पुष्कळ प्रमाणात हानी झाली आहे. ८ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती आहे. इतर ठिकाणी शेतीला फटका बसला आहे. महाराष्ट्र शासनाकडून साहाय्य केले जाणार आहे. काही तातडीचे साहाय्यही राज्यशासनाकडून केले जात असून आढाव्यानंतर आणखी साहाय्य केले जाईल. ‘राष्ट्रवादी काँग्रेस वेल्फेअर ट्रस्ट’च्या माध्यमातून १६ सहस्र ‘किट’चे वाटप केले जाणार आहे. या ‘किट’मध्ये २ ताटल्या, २ ग्लास, २ वाट्या, २ शिजवण्याची भांडी, १ तवा, १ चमचा आणि पोळपाट-लाटणे यांचा समावेश आहे.

संकटग्रस्त भागात अडचणी येत असल्याने राजकीय नेत्यांनी दौरे टाळावेत !

राज्यात संकटग्रस्तांचे कोरोनापासून रक्षण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपाययोजना करण्यात आली आहे. संकटग्रस्त भागात राजकीय नेत्यांच्या दौर्‍यांमुळे कामात अडथळे येतात, हा माझा पूर्वीचा अनुभव आहे. अशा घटना घडल्यानंतर लोक गाड्या घेऊन संकटग्रस्तांच्या भेटी घेण्यासाठी जातात. अशाने आधीच व्यस्त असलेल्या शासकीय यंत्रणांना अडथळे निर्माण होतात. त्यांचे लक्ष विचलित होते. माझे आवाहन आहे की, असे दौरे टाळा. मी लातूर येथे असतांना आम्ही सगळे कामात होतो. तेव्हा मी पंतप्रधानांना सांगितले होते की, १० दिवस तुम्ही येऊ नका. तुम्ही आलात, तर शासकीय यंत्रणांना तिथे लक्ष घालावे लागेल.

राज्यपालांचे केंद्र शासनाशी चांगले संबंध असल्याने ते अधिक साहाय्य आणू शकतात !

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही हानीग्रस्त भागांचा दौरा केला. त्यावर शरद पवार म्हणाले की, नेत्यांच्या दौर्‍यांमुळे धीर मिळतो; पण शासकीय यंत्रणांचे कामही वाढते, हे तितकेच खरे आहे. दौर्‍यांमुळे यंत्रणांनाच त्रास होतो. राज्यपाल दौर्‍यावर जात आहेत, हे ठीक आहे. त्यांचे केंद्र शासनाशी चांगले संबंध असल्याने ते अधिक साहाय्य आणू शकतात. केंद्र शासनाकडून साहाय्य मागवण्यासाठी राज्यपालांचा उपयोग व्हावा.