कोरोनाची लस घेतलेले लोकही ‘डेल्टा’ विषाणू प्रकारामुळे होत आहेत संक्रमित !

लस न घेतलेल्यांमध्ये याचे संक्रमण सहजतेने होत असल्याचे विशेषज्ञांचे मत !

नवी देहली – कोरोनाचा ‘डेल्टा’ विषाणूचा प्रकार (व्हेरिएंट) हा घातक असून जगभरात तो चिंतेचा विषय बनला आहे. भारतातही कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत गतीने संक्रमण वाढण्यामागे डेल्टा प्रकारच कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. या विषाणूच्या संक्रमणाची गती अधिक असून कोरोनाची लस घेतलेल्या लोकांनाही याचे संक्रमण होत असल्याचे अनेक देशांत समोर येत आहे. विशेषज्ञांच्या मते ज्या लोकांनी लस घेतलेली नाही, त्यांच्यात या विषाणू प्रकाराचे संक्रमण अधिक गतीने होत आहे.

‘पब्लिक हेल्थ इंग्लंड’ने म्हटले आहे की, डेल्टा विषाणू प्रकारामुळे संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांपैकी २२.८ टक्के लोक लस घेतलेले आढळले. सिंगापूरमध्ये डेल्टा विषाणूचे संक्रमण झालेल्यांपैकी ७५ टक्के रुग्णांनी लस घेतली होती. इस्रायलमध्ये ही संख्या ६० टक्के आहे.

‘जीनोमिक्स’ शास्त्राचे विशेषज्ञ एरिक टोपोल यांनी दिलेल्या माहितीनुसार डेल्टा विषाणू प्रकार हा कोरोना संक्रमणासाठी अधिक धोकादायक असून त्याचा गतीने संसर्ग होतो. त्यामुळे ज्या लोकांनी कोरोनाच्या दोन्ही लसी घेतल्या आहेत, त्यांनीसुद्धा डेल्टा प्रकारापासून सावध रहाण्याची आवश्यकता आहे.