अतीवृष्टीमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीमागे मिळणार ७ लाख रुपये

उपमुख्यमंत्री अजित पवार

सातारा – अतीवृष्टीमध्ये मृत्यू झालेल्या कुटुंबियांना माणसी ७ लाख रुपये आर्थिक साहाय्य देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केला. तसेच सातारा जिल्ह्याला विशेष गोष्ट म्हणून १०० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी देणार असल्याचेही पवार यांनी सांगितले. सांगली येथील पूरस्थितीची पहाणी करून सातारा येथील जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये त्यांनी जिल्ह्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला. तेव्हा ते बोलत होते. या वेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, तसेच जिल्ह्यातील आमदार आणि विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

या वेळी अजित पवार उपस्थित प्रशासकीय अधिकार्‍यांना म्हणाले की, नैसर्गिक घटनांशी सामना करण्यासाठी चांगल्या प्रतीच्या बोटी आणि वस्तू यांची खरेदी करा. अनेक ठिकाणी ब्रिटीशकालीन मोरी पूल वाहून जाण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे गावेच्या गावे संपर्कहीन होत आहे. यापुढे मोरी पुलांऐवजी सार्वजनिक बांधकाम विभागाने सिमेंटचे स्लॅबचे पूल बांधावेत. अतीवृष्टीमध्ये हानी झालेल्या घरांचे पंचनामे येत्या ४ दिवसांमध्ये पूर्ण करा. ज्यांनी घरे गमावली आहेत, त्यांना सरकारकडून चांगली घरे देण्यात येणार आहेत. भूस्खलन झालेल्या नागरिकांना महसूल आणि वनविभागाच्या जागा उपलब्ध करून द्या. १५ ऑगस्टपर्यंत या सर्व कामांचा निपटारा झाला पाहिजे.

‘राष्ट्रीय आपत्ती निवारण पथका’चे केंद्र स्थापन करण्याची करणार मागणी

पावसाळा आला की, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांची स्थिती गंभीर होते. काही वेळा आपद्ग्रस्त भागांना तातडीने साहाय्य मिळत नाही. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी कराड या ठिकाणी ‘राष्ट्रीय आपत्ती निवारण पथका’चे केंद्र स्थापन करण्याची मागणी करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.