कोंढावळे (जिल्हा सातारा) येथे डोंगरकडा कोसळून आई-मुलीचा मृत्यू !

दावणीला बांधलेली जनावरे सोडता न आल्यामुळे त्यांचा मृत्यू

डोंगरकडा कोसळून आई-मुलीचा मृत्यू (प्रातिनिधिक चित्र )

सातारा, २५ जुलै (वार्ता.) – वाई तालुक्यातील देवरूखवाडी-कोंढावळे येथे मुसळधार पावसामुळे डोंगरकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत आई आणि मुलगी यांचा अंत झाला. तसेच २ जणांना गंभीर दुखापत झाली असून ३ म्हशी आणि ४ रेडके ढिगार्‍याखाली दबले जाऊन मृत्युमुखी पडले आहेत.

२४ जुलै या दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे सायंकाळी ७ वाजता डोंगरकडा कोसळून ८ ते १० घरे मातीच्या ढिगार्‍याखाली दबली गेली. १७ ते १८ घरांची वस्ती असलेल्या या गावात डोंगरकडा कोसळतांना स्थानिकांनी आरडाओरडा केला; मात्र राहीबाई कोंढाळकर (वय ८० वर्षे) आणि त्यांची मुलगी भीमाबाई वाशिवले (वय ६२ वर्षे) यांना आवाज ऐकू न आल्याने त्या दोघी घरातच थांबल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. बाहेर पडलेले २० ते २५ जण वाचले. अचानक घडलेल्या या घटनेमध्ये दावणीला बांधलेली जनावरे सोडता न आल्यामुळे त्यांचाही यात दुर्दैवी अंत झाला. घटना सायंकाळी घडल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. माती, मुसळधार पाऊस, तुटलेले रस्ते, चिखल, खंडित झालेला वीजपुरवठा यांमुळे सहाय्यात अडथळे येत होते.