भारतीय वृत्तछायाचित्रकाराची तालिबानकडूनच हत्या झाल्याचे उघड
|
नवी देहली – भारतातील वृत्तछायाचित्रकार आणि ‘पुलित्जर’ पुरस्कार विजेता दानिश सिद्दीकी यांची काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानमध्ये हत्या करण्यात आली होती. त्यांचा मृत्यू गोळी लागून झाल्याचे सांगण्यात आले होते. ही हत्या तालिबानने केल्याचे म्हटले जात होते; मात्र तालिबानने हत्येचा आरोप फेटाळून स्वतः निर्दोष असल्याचे चित्र उभे केले होत. तालिबानच्या आतंकवाद्यांनी त्याला गोळी मारल्यानंतर त्याचे डोके चारचाकी वाहनाखाली चिरडल्याची माहिती अफगाणिस्तान सैन्याचे कमांडर बिलाल अहमद यांनी ‘आज तक’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली. दानिश सिद्दीकी ‘रॉयटर्स’ या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेकडून अफगाणिस्तान येथे छायावृत्तांकनासाठी गेले होते.
अहमद यांनी सांगितले की, तालिबानच्या आतंकवाद्यांनी आधी दानिश सिद्दीकी यांना गोळी मारली, त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांना समजले की, दानिश सिद्दीकी भारतीय आहे. तालिबानला भारताचा राग असल्याने त्यांनी दानिश सिद्दीकी यांच्या मृतदेहाची विटंबना केली. मृत्यू झाल्यानंतरही आतंकवाद्यांनी दानिश सिद्दीकी यांच्या डोक्यावर गाडी चढवली आणि त्यांचे डोके चिरडले.
(म्हणे) ‘दानिश याने आम्हाला विचारून अफगाणिस्तानात यायला हवे होते ! – तालिबान
‘आज तक’च्या वार्ताहराने तालिबानचा प्रवक्ता आणि कमांडर मौलाना यूसुफ अहमदी याच्याशी कंदहार येथे चर्चा केल्यावर त्याने म्हटले की, दानिश याला आम्ही मारले नाही. (तालिबानचा खोटारडेपणा ! जर दानिश याला तालिबानने ठार केले नाही, तर त्यांना अन्य कुणी आणि का मारले, हे तालिबान सांगील का ? – संपादक) तो शत्रूच्या सैन्यासमवेत होता. कुणा पत्रकाराला अफगाणिस्तानमध्ये यायचे असेल, तर त्याने प्रथम आमच्याशी संपर्क साधायला हवा.