नागपूर येथील पोलीस उपनिरीक्षकासह २ पोलीस कर्मचारी निलंबित !

अपंग मनोज ठवकर यांचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाल्याचे प्रकरण

अशा पोलिसांवर केवळ निलंबनाची कारवाई नको, तर त्यांना आजन्म कारागृहात ठेवण्याची शिक्षा केली पाहिजे, असेच जनतेला वाटते !

नागपूर – पोलिसांच्या मारहाणीत येथील मनोज ठवकर नावाच्या अपंग तरुणाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी पोलीस उपनिरीक्षक मुकेश ढोबळे, पोलीस शिपाई नामदेव चरडे आणि आकाश शहाणे यांना २१ जुलै या दिवशी निलंबित केले. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (‘सीआयडी’च्या) वतीने या प्रकरणाची चौकशी चालू आहे.

१. काही दिवसांपूर्वी मनोज ठवकर हे बाजारातून घरी जात असतांना पारडी परिसरात पोलिसांची नाकाबंदी चालू होती. पोलिसांनी दुचाकीवरून जाणारे मनोज यांना थांबण्यास सांगितले; मात्र मनोज हे पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे पोलीस संतप्त झाले आणि त्यांनी मनोज यांना बेदम मारहाण केली. यात मनोज यांचा मृत्यू झाला.

२. या घटनेनंतर पारडी परिसरातील नागरिक संतप्त झाले. ‘मनोज ठवकर यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाला आहे’, असा आरोप नागरिकांनी केला. तेथे २ दिवस तणावाचे वातावरण होते.

३. याविषयी स्थानिक आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर वरील ३ पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

४. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मनोज यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. कुटुंबियांनी दोषी पोलिसांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.