नगर, २१ जुलै – छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्या विरोधात १९ जुलै या दिवशी न्यायालयात ६० पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट करण्यात आले. गुन्हा घडला तेव्हा छिंदम उपमहापौरपदावर होते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र प्रविष्ट करण्यासाठी गृहविभागाची अनुमती हवी असते. ती मिळवण्याची प्रदीर्घ प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे. व्हायरल झालेल्या ‘ऑडिओ क्लिप’मधील आवाज छिंदम यांचाच असल्याचा ‘फॉरेन्सिक लॅब’चा अहवाल आणि ६ साक्षीदारांचे जबाब यांचा दोषारोपपत्रात समावेश आहे. छिंदम यांना सध्या जामीन मिळाला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांच्याविरुद्ध देहली गेट येथील गाळ्यांच्या प्रकरणातून जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हाही नोंद झालेला आहे.
छिंदम यांनी १६ फेब्रुवारी २०१८ या दिवशी महापालिकेचे अधिकारी अशोक बिडवे यांच्याशी दूरभाषवरून बोलतांना त्यांना शिवीगाळ करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. ही ‘ऑडिओ क्लिप’ नंतर ‘व्हायरल’ झाली होती. या प्रकरणी शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी तक्रार दिली होती. त्यावरून हा गुन्हा नोंद झालेला आहे. या क्लिपचा वापर मुख्य पुरावा म्हणून होणार आहे.