बकरी ईदच्या दिवशी होणारी जनावरांची हत्या बंद करण्याची बंगालमधील मुसलमानाची मागणी

आता तरी मुसलमान समाज त्याच्या समाजबांधवाची मागणी मान्य करील का ? अशांच्या मागे सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उभे रहाणे आवश्यक !

अल्ताब हुसेन

कोलकाता – बकरी ईदच्या दिवशी केली जाणारी जनावरांची हत्या बंद करण्याची मागणी बंगालमधील अल्ताब हुसेन यांनी केली. जनावरांच्या होणार्‍या हत्येच्या विरोधात आवाज उठवत त्यांनी ७२ घंट्यांचा रोजा (उपवास) ठेवला. ३३ वर्षीय हुसेन यांनी यंदाच्या वर्षीची ईद कोणत्याही प्रकारचा मांसाहार न करता साजरी केली. तथापि प्रतिवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी हुसेन यांच्या भावाने ईदला कुर्बानीसाठी बोकड आणल्याने हुसेन यांनी दुःख व्यक्त केले. हुसेन म्हणाले की, प्राण्यांप्रती क्रूरता वाढली असून त्याविरोधात कुणीही आवाज उठवतांना दिसत नाही. मला प्राण्यांच्या हत्येकडे लोकांचे लक्ष वेधायचे आहे. त्यामुळे मी ७२ घंट्यांचा रोजा ठेवत आहे. हुसेन यांनी वर्ष २०१४ मध्ये एके ठिकाणी प्राण्यांसमवेत केली जाणारी क्रूरता पाहिली आणि तेव्हापासून त्यांनी मांस खाणे सोडून दिले. तेव्हापासून ते पूर्णपणे शाकाहारी बनले.

सामाजिक माध्यमांतून धमक्या !

३ वर्षांपूर्वी माझ्या भावाने हत्येसाठी आणलेल्या प्राण्याला मी कसेबसे वाचवू शकलो होतो. माझी भूमिका आमच्या घरात कुणालाही मान्य नाही. प्राण्यांप्रतीच्या क्रूरतेविरुद्ध मी आवाज उठवू लागल्यापासून मला सामाजिक माध्यमांतून धमक्या दिल्या जात आहेत; मात्र काही जण मला साहाय्यही करत आहेत.