फक्त कलाकारांनाच नियमांचा जाच का ? – शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांचा प्रश्‍न

शास्त्रीय गायक राहुल देशपांडे

पुणे – निर्बंध असतांनाही अनेक वेळा होणार्‍या राजकीय कार्यक्रमातील गर्दीकडे कानाडोळा केला जातो; मात्र कलाकारांनी कार्यक्रम सादर करायचे नाहीत, अशी दुटप्पी भूमिका असल्याने कलाकारांना नियमांचा जाच का ? असा प्रश्‍न प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी पत्रकारांशी बोलतांना उपस्थित केला.

कला आणि मनोरंजन ही समाजाची आवश्यकता असून कलाकार ठीक असतील तरच समाज चांगला राहील, असेही त्यांनी या वेळी सांगितले. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने राहुल देशपांडे आणि अभिनेते आनंद इंगळे यांनी कलाक्षेत्रातील परिस्थितीला वाचा फोडली. दुपारी ४ नंतर असणारी संचारबंदी तसेच विकेंड लॉकडाऊनमुळे सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणावर बंदी आहे. त्यामुळे मनोरंजन क्षेत्रावर अवलंबून असलेल्या लोकांच्या उत्पन्नाचा प्रश्‍न कायम आहे. या पार्श्‍वभूमीवर ५० टक्के आसनक्षमतेने नाट्यगृह आणि चित्रपटगृहे चालू व्हावेत. कलाक्षेत्रातील संबंधित असणार्‍या गरीब कुटुंबांना निधी देणे शक्य नसेल, तर निदान योजनांचा तरी लाभ करून दिला पाहिजे याकडे राहुल देशपांडे यांनी लक्ष वेधले. आता सर्व व्यवहार चालू झाल्यावर नाट्यगृहे, चित्रपटगृहे का बंद आहेत ? सरकारने दिवाळीपर्यंत कलाक्षेत्र सुरळीत करावे, असे मत अभिनेते आनंद इंगळे यांनी व्यक्त केले.