१. रामनाथी आश्रमात जातांना ‘पुष्कळ दिवसांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन होणार’, या जाणिवेने भावाश्रू येणे
‘मला काही वर्षांपूर्वी रामनाथी आश्रमात जाण्याची संधी मिळाली. मी आश्रमात प्रथमच येत होतो. पूर्वी परात्पर गुरु डॉ. आठवले नाशिकला यायचे. नंतर ते नाशिकला न आल्याने माझी त्यांच्याशी प्रति सहा मासांनी होणारी भेट गेल्या काही वर्षांत झाली नव्हती. आता रामनाथी आश्रमात गेल्यावर दर्शन होणार होते; म्हणून मी हरखून गेलो होतो. मी गोव्याला जातांना पुणे ते सातारा प्रवास भावाश्रूंमुळे डोळे पुसत पुसत केला. ‘माझ्या शेजारी बसलेल्या व्यक्तींचा अपसमज होऊ नये’, यासाठी स्वतःला सावरले.
२. आश्रमातील सजीव-निर्जीव (भिंतीपासून ते प्रत्येक साधकात) गोष्टींत परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व जाणवत असल्याने त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा न्यून होणे
‘मला परात्पर गुरु डॉक्टर भेटणार’, या आनंदात मी आश्रमात प्रवेश केला. मी आश्रमात प्रवेश केल्यावर मला प्रत्येक ठिकाणी परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व जाणवत होते. मला आश्रमातील सजीव-निर्जीव (भिंती पासून ते प्रत्येक साधक) गोष्टींत परात्पर गुरु डॉक्टर दिसत होते. त्यामुळे माझी त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा न्यून झाली. मला आश्रमात येऊन ४ दिवस झाले, तरी मी ‘आश्रमात परात्पर गुरु कुठे रहातात ?’, याची चौकशीही केली नव्हती.
३. ‘परात्पर गुरु डॉक्टरांचा सत्संग आहे’, असे समजल्यावर भावाश्रू वाहू लागणे
मी आश्रमात आल्याच्या १० व्या दिवशी ‘कलेशी संबंधित सेवा शिकण्यासाठी आलेल्या साधकांसाठी संध्याकाळी परात्पर गुरु डॉक्टरांचा सत्संग आहे’, असे मला समजले आणि १० दिवस विसरलेल्या माझ्या भावाश्रूंना पुन्हा महापूर आला. मी स्वागतकक्षात काही कामासाठी गेलो होतो आणि तेथेच रेंगाळलो; कारण माझ्या भावाश्रूंना वाट करून द्यायची होती. स्वागतकक्षातील साधकांना याची सवय असावी. त्यामुळे माझ्या अस्तिवाची कुणी नोंद घेतली नाही. परात्पर गुरु डॉक्टरांची भेट होईपर्यंतचे २ – ३ घंटे मला त्यांना न भेटलेल्या वर्षांहून अधिक वाटत होते.
४. परात्पर गुरु डॉक्टरांशी पुष्कळ बोलायचे असणे; परंतु अन्य साधक पाहून स्वतःच्या मनाला आवर घालणे
त्या दिव्य क्षणाची वेळ आली. आम्ही नियोजित स्थळी एकत्र आलो. तेथे आधीच भारतातील अन्य ठिकाणांहून आलेले साधक बसले होते. ते परात्पर गुरु डॉक्टरांना प्रथमच भेटणार होते. त्यामुळे त्यांना पुढे बसवले होते. मी सर्वांत मागे बसलो होतो. मला परात्पर गुरु डॉक्टरांशी पुष्कळ बोलायचे होते; पण अन्य साधक पाहून मी माझ्या मनाला आवरले.
५. परात्पर गुरु डॉक्टरांनी सर्वांना मार्गदर्शन करतांना साधकाची इच्छा पूर्ण करणे
नंतर परात्पर गुरु डॉक्टर साधकांना भेटण्यासाठी खोलीत आले आणि माझ्याकडे पाहून म्हणाले, ‘‘अरे, तुम्हीपण आलात का ?’’ मी येण्याचे कारण सांगितले. सर्वांची ओळख झाल्यावर त्यांचे मार्गदर्शन चालू झाले. ते नाशिक येथील एका संतांविषयी बोलत होते. त्या वेळी ते प्रत्येक ५ मिनिटांनी मला म्हणायचे, ‘‘असेच घडले ना ! ओझरकर, बरोबर आहे ना ! ओझरकर.’’ ते केवळ माझ्याशीच संवाद साधत होते आणि माझी अंतर्मनातली इच्छा पूर्ण करत होते. एकाच वेळी ते सर्वांना मार्गदर्शन करत होते आणि गेल्या काही वर्षांत माझी त्यांच्याशी भेट न झाल्यामुळे हरवलेल्या माझ्या मनाला सांधत होते.’
शब्दांवाचून सारे कळते ।
निःशब्द रहाता सारे मिळते ॥ १ ।।
मनुष्यजन्माचे सार्थक होते ।
शब्दांवाचून सारे मिळते ॥ २ ।।
– श्री. मुकुंद ओझरकर, नाशिक (२५.३.२०१९)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |