देशात वर्ष २०१४ ते २०१९ या काळात देशद्रोह्याच्या एकूण ३२६ गुन्ह्यांत केवळ ६ जणांनाच शिक्षा ! – केंद्रीय गृह मंत्रालयाची माहिती

देशात गुन्हेगारांना अनेक वर्षांनंतरही शिक्षा होणार नसेल, तर गुन्हेगारी कधीतरी न्यून होईल का ? ही स्थिती आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !

नवी देहली – वर्ष २०१४ ते २०१९ या काळात देशद्रोहाच्या अंतर्गत एकूण ३२६ गुन्हे नोंदवण्यात आले होते आणि त्यांपैकी केवळ ६ जणांना शिक्षा करण्यात आली, अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली आहे. वर्ष २०२० ची आकडेवारी सिद्ध करण्यात आली नसल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

१. झारखंडमध्ये ४०, हरियाणात ३१, बिहार, जम्मू-काश्मीर आणि केरळ या राज्यांमध्ये प्रत्येकी २५, कर्नाटकमध्ये २२, उत्तरप्रदेशात १७, बंगालमध्ये ८, देहलीमध्ये ४, तर महाराष्ट्र, पंजाब आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये प्रत्येकी एक गुन्हा नोंदवण्यात आला. अन्य काही राज्यांमध्येही गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

२. ३२६ गुन्ह्यांपैकी सर्वाधिक ५४ गुन्हे आसाममध्ये नोंदवण्यात आले. विशेष म्हणजे वर्ष २०१४ ते २०१९ या काळात राज्यात एकाही व्यक्तीला शिक्षा झाली नाही.

३. १४१ गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करण्यात आले आणि ६ वर्षांच्या कालावधीत यांपैकी केवळ ६ जणांना शिक्षा झाली.

४. ‘लोकमान्य टिळक आदींसारख्या लोकांसाठी ब्रिटिशांनी वापरलेल्या कायद्यातील देशद्रोहाच्या भा.दं.वि. कलम १२४ (अ) ची तरतूद रहीत का करत नाही ?’ अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच केंद्रशासनाला केली होती.