आषाढी वारीला अनुमती नाकारल्याच्या निषेधार्थ विश्व हिंदु परिषदेचे राज्यात १५४ ठिकाणी तीव्र भजनी आंदोलन !

  • नैतिक दायित्व स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी आषाढीला पंढरपूरला न जाण्याचे आवाहन

  • वारकरी संप्रदायही सहभागी

मुंबई – आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे पायी जाण्याची अनुमती नाकारल्याच्या निषेधार्थ १७ जुलै या दिवशी विश्व हिंदु परिषदेच्या वतीने राज्यात १५४ ठिकाणी तीव्र भजनी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात वारकरी संप्रदायही सहभागी झाला होता. ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याच्या घटनेचा या वेळी निषेध करण्यात आला. या सर्वांचे नैतिक दायित्व स्वीकारून ‘मुख्यमंत्र्यांनी आषाढीला पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाऊ नये’, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

याविषयी विश्व हिंदु परिषदेच्या वतीने काढण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात स्वतंत्र भारतात राज्यघटनेने प्राप्त झालेला उपासनेचा अधिकार त्याआधी मोगल आणि इंग्रज यांच्या काळातही अबाधित होता. यावर सरकार गदा आणत आहे. आंदोलनानंतर ठिकठिकाणी प्रशासकीय अधिकार्‍यांना निवेदने देण्यात आली. आंदोलनानिमित्त वारकर्‍यांवर कोणते गुन्हे नोंदवण्यात आले असल्यास सरकारने ते मागे घ्यावेत. चातुर्मासात मंदिरात चालणारे पारंपरिक उत्सव, नामसप्ताह, कीर्तन, प्रवचन, भजने आणि देवदर्शन यांवरील प्रतिबंध दूर करावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

आंदोलनाच्या वेळी वडाळा येथे प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून काही आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी कह्यात घेतले. नंतर त्यांना सोडून देण्यात आले.

घाटकोपर येथे आंदोलकांनी केले भजन-कीर्तन !

घाटकोपर, भटवाडी येथील गणेश मंदिराच्या येथे सरकारच्या निषेधासाठी एकत्र आलेल्या आंदोलकांनी भजन म्हटले. या वेळी ह.भ.प. राठोड महाराज यांनी कीर्तन केले. पावसामध्येही आंदोलकांनी आंदोलन चालूच ठेवले.

ठाणे येथे मागण्यांचे निवेदन देण्यासाठी जाणारे ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. एकनाथ महाराज सदगीर आणि विश्व हिंदु परिषदेचे कार्यकर्ते पोलिसांच्या कह्यात !

ठाणे येथील तलावपाळी परिसरातून जिल्हाधिकारी कार्यालयात विविध मागण्यांचे निवेदन देण्यासाठी वारकरी संप्रदाय आणि विश्व हिंदु परिषदेचे कार्यकर्ते टाळ-मृदुंगाचा गजर करत जात होते. त्यात सहभागी झालेले ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. एकनाथ महाराज सदगीर आणि विश्व हिंदु परिषदेचे कार्यकर्ते यांना नौपाडा पोलिसांनी कह्यात घेतले.

सरकारच्या मागून काही अदृश्य शक्ती हिंदु धर्मातील रूढी-परंपरा यांना दाबण्याचा प्रयत्न करत आहेत ! – ह.भ.प. एकनाथ महाराज सदगीर, कोकण प्रांत धर्माचार्य, विश्व हिंदु परिषद

इंग्रज आणि मोगल यांच्या काळापासून वारीची परंपरा चालू आहे. मागील वर्षी कोरोनाचे प्रमाण अधिक होते; पण आता सर्व व्यवहार चालू आहेत. अनेक लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येत आहेत; पण सामाजिक अंतर ठेवून आणि कोरोनाचे नियम पाळून वारी काढण्यालाही सरकारने अनुमती नाकारणे हे दुःखदायक वाटते, तर ह.भ.प. संतवीर बंडातात्या कराडकर यांना नजरकैदेत ठेवले जाते. या सर्वच प्रकारावरून वाटते की, केवळ हिंदूंचे सण, रूढी-परंपरा यांविषयी नियम कडक केले जातात. या सरकारच्या आडून कुणीतरी अदृश्य शक्ती हिंदूंच्या रूढी-परंपरा यांना हेतुपुरस्सर दाबण्याचा प्रयत्न करत आहे.

भिवंडी आणि ठाणे येथेही प्रतिकात्मक दिंडी अन् निवेदन !

भिवंडी येथे आंदोलन करतांना वारकरी संप्रदाय, विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांचे कार्यकर्ते

भिवंडी येथे विश्व हिंदु परिषद, बजरंग दल आणि वारकरी संप्रदाय यांनी कल्याण नाका येथील साक्रा देवी मंदिर ते उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत प्रतिकात्मक दिंडी काढून राज्य सरकारच्या निर्णयाचा निषेध केला. या आंदोलनात वारकरी भजन म्हणत आणि भगव्या पताका नाचवत सहभागी झाले होते. त्यानंतर उपविभागीय कार्यालयासमोर रिंगण करून आंदोलन करत मागण्यांचे लेखी निवेदन प्रांताधिकार्‍यांना देण्यात आले.

भिवंडी येथे अधिकार्‍यांना निवेदन देतांना वारकरी संप्रदाय, विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांचे कार्यकर्ते.

भिवंडी येथील विश्व हिंदु परिषदेचे प्रमुख पदाधिकारी अधिवक्ता मनोज रायचा, भिवंडीचे शहराध्यक्ष देवराज राका, प्रमिला भोईर, मुरलीधर नांदगावकर, बजरंग दल संयोजक दादा गोसावी, ह.भ.प. मनोहर महाराज वडजे, ह.भ.प. सुनील महाराज नाईक, डॉ. दिनकर नाईक, दुर्गा वहिनीच्या संध्या त्रिपाठी, मातृशक्तीच्या जयश्री पिंपळे, बाबूलाल पुरोहित, वैभव महाडिक, विजय गुप्ता, पंकज गुप्ता, कृष्णा माने, समीर पटेल यांसह वारकरी संप्रदाय, विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.