विद्यापीठ अनुदान आयोग अभ्यासक्रमात राष्ट्रपुरुषांच्या इतिहासाचा समावेश करत असल्याचे प्रकरण
मुंबई – आपल्या देशाचा इतिहास मोगलांपासून चालू झाला आहे का ? आक्रमकांना किती महत्त्व द्यायचे, याला मर्यादा आहेत. पूर्वजांनी केवळ मारच खाल्ला, हा इतिहास पुढील पिढीने वाचायचा का ? चंद्रगुप्त मौर्य, चाणक्य, शालिवाहन, समुद्रगुप्त आदी पराक्रमी राजांविषयी का शिकवले जात नाही ? सशक्त देश निर्माण करणारी पिढी घडवण्यासाठी आपली संस्कृती आणि पराक्रम यांचा तेजस्वी इतिहास शिकवला गेला पाहिजे. राष्ट्रावर प्रेम करणार्या प्रत्येक भारतियाची ही इच्छा आहे, असे मत ज्येष्ठ अभ्यासक आणि व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी व्यक्त केले. विद्यापीठ अनुदान आयोग अभ्यासक्रमात मोगलांच्या ऐवजी राष्ट्रपुरुषांचा इतिहासाचा समावेश करत असल्याच्या निर्णयावर काँग्रेसच्या नेत्यांनी केंद्रशासनावर टीका केली. यावर डॉ. शेवडे यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.
डॉ. शेवडे पुढे म्हणाले,
१. अभ्यासक्रमात बहुमताच्या जोरावर नव्हे, तर तज्ञांची मते घेऊन पालट केले जातात. काही जण ‘आमच्या पक्षाने देश घडवला’, अशी बालीश विधाने करतात. हा राजकीय पक्षाचा विषय नाही.
२. भारताचा दैदिप्यमान इतिहास भावी पिढीपर्यंत पोचवायला नको का ? स्वातंत्र्य मिळाल्यापासून रानटी आक्रमक, तसेच भारतियांमध्ये जातीभेद आणि शत्रुत्व निर्माण करणारे साम्यवादी यांचा इतिहास का शिकवला जातो ? रशिया, फ्रेंच राज्यक्रांतींचा आपल्याला काय उपयोग ?
३. ‘२-३ व्यक्तींमुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले’, या थाटात इतिहास का शिकवला जातो ? याकडे दुर्लक्ष करून विरोधक नको त्या गोष्टींविषयी आरडाओरडा करत आहेत.
४. पोलंड आणि रशिया ख्रिस्ती देश असूनही स्वातंत्र्यानंतर पोलंडमध्ये रशियाने बांधलेले चर्च त्यांनी पाडले. अशा प्रकारे राष्ट्रीय अस्मिता जागृत असायला हवी.
५. देशवासियांना अभिमान वाटेल, अशा इतिहासाचा समावेश स्वागतार्ह आहे.