सातारा, १६ जुलै (वार्ता.) – अजिंक्यतारा किल्ल्यावर ‘राजा शिवछत्रपती परिवार’ या संस्थेकडून स्वच्छता करण्यात आली होती. या वेळी काही ठिकाणी उत्खनन केले असता एक शिवकालीन दगडी चौथरा आणि चौथर्याच्या बाजूलाच एक भली मोठी लोखंडी पेटी आढळून आली आहे. सातारा शहर ज्यांनी वसवले, ते श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (थोरले) यांच्या काळातील हा चौथरा असल्याचा कयास आहे. तसेच आढळून आलेली पेटी ही इंग्रजकालीन असल्याचा कयास व्यक्त केला जात आहे. ‘या पेटीमध्ये बंदुकीची काडतुसे, खजिना किंवा कागदपत्रे ठेवली जात असावीत’, असे तज्ञांचे मत आहे. ‘किल्ल्यावर अजून उत्खनन केल्यास अनेक ऐतिहासिक गोष्टी प्रकाशात येतील’, असे ‘राजा शिवछत्रपती परिवार’ या संस्थेचे म्हणणे आहे.