पुरातत्व विभागाने ३१ जुलैपर्यंत आराखडा मंदिर समितीकडे सादर करावा !

विधान परिषद उपसभापती निलम गोर्‍हे यांचे निर्देश

विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोर्‍हे बैठकीत संबोधित करताना

पंढरपूर (जिल्हा सोलापूर), १६ जुलै (वार्ता.) – येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे भारतीय पुरातत्व विभागाकडून संरचनात्मक परीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करून सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) सिद्ध करण्यात येणार आहे. मंदिराचे मूळ स्वरूप कायम ठेऊन तो अहवाल मंदिर समितीकडे ३१ जुलैपर्यंत सादर करावा, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोर्‍हे यांनी दिले.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून करण्यात येणार्‍या कामांविषयी, तसेच पुरातत्व विभागाकडून सिद्ध करण्यात येणार्‍या आराखड्याविषयी येथील संत तुकाराम भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी त्यांनी हे निर्देश दिले.

बैठकीस नगराध्यक्षा साधना भोसले, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, पुरातत्व विभागाचे श्री. वाहने, कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि मंदिर समितीचे सदस्य उपस्थित होते.

या वेळी विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोर्‍हे म्हणाल्या की,

१. भारतीय पुरातत्व विभागाने सिद्ध केलेला आराखडा मंदिर समितीला सादर केल्यानंतर मंदिर समितीने अधिकारी, इतिहासकार, संस्कृतचे अभ्यासक यांच्याशी चर्चा करून त्यांचे मत जाणून घ्यावे. आराखडा सिद्ध झाल्यानंतर आपत्कालीन व्यवस्था, भाविकांची सुरक्षितता याविषयी बैठका घेऊन चर्चा करावी. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर हे विधी आणि न्याय विभागाच्या अखत्यारित असल्याने या आराखड्यावर शासन योग्य तो  निर्णय घेईल.

२. नामसंकीर्तन सभागृहासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याविषयी पाठपुरावा करणार आहे, तर शेगावच्या धर्तीवर सुशोभित असे उद्यान पंढरपूर येथे सिद्ध  करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा, तसेच पालखी मार्गावर आवश्यक ठिकाणी रुग्णवाहिकेची व्यवस्था आणि माहिती फलक लावावेत.