दुधात भेसळ करणार्‍यांवर कारवाई करावी ! – बळीराजा शेतकरी संघटनेची मागणी

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाही ?

सातारा, १६ जुलै (वार्ता.) – जिल्ह्यात दुधात भेसळ करणार्‍या दूध संघांवर अन्न आणि भेसळ विभागाने कारवाई करावी, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. कारवाई करण्यात टाळाटाळ केल्यास साहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणीही संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.

बळीराजा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि साहाय्यक आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये म्हटले आहे की, सर्वसामान्य नागरिकांचा सकस आहार म्हणून ओळखल्या जाणार्‍या दुधात प्रचंड प्रमाणात भेसळ केली जात आहे. यामध्ये युरिया, पामतेल, मेलामाईनसारखे विषारी रसायन मिसळून सामान्यांच्या जीवाशी खेळले जात आहे. राज्य सरकारने कायद्यामध्ये पालट करून प्रशासन अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात दूध आणि अन्न यांमध्ये भेसळ झाल्यास संबंधित अन्न-भेसळ अधिकार्‍यांवर उत्तरदायित्व निश्‍चित करावे. त्यामुळे भेसळ करणार्‍यांवर अंकुश ठेवता येईल.