‘देवद येथील आश्रमात टंकलेखनाची सेवा करणार्या ६४ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या सौ. चंद्ररेखा (जिजी) जाखोटिया (वय ६१ वर्षे) यांचे १६.६.२०२१ या दिवशी निधन झाले. १५.७.२०२१ या दिवशी त्यांचे मासिक श्राद्ध आहे. त्या निमित्त साधिकेला जिजींच्या निधनाविषयी मिळालेली पूर्वसूचना येथे देत आहोत.
१. एक दिवस जिजींच्या मुलाशी बोलतांना त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करणे आणि तो त्यांच्या शारीरिक त्रासाविषयी सांगत असतांना ‘जिजी काही दिवसच आपल्यात आहेत, त्यांना भेटायला जाऊया’, असे वाटणे
‘सौ. चंद्ररेखा (जिजी) जाखोटिया या संकलन विभागाच्या अंतर्गत टंकलेखन करणे आणि काही मराठी धारिकांचे हिंदी भाषांतर करणे, अशा सेवा करत होत्या. त्यामुळे त्यांच्याशी अधूनमधून संपर्क येत होता. १४.६.२०२१ या दिवशी संध्याकाळी देवाने ‘त्यांचा मुलगा श्री. संपत यांच्या बाजूला जेवायला बसूया’, असा विचार दिला. त्यांच्याशी बोलतांना मी जिजींची विचारपूस केली. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘त्यांना गोळ्या घ्यायच्या आहेत; परंतु त्यांना जेवण जात नाही.’’ त्यांना होणारा शारीरिक त्रास पुष्कळ असल्याने गोळ्या घेणे आवश्यक असल्याचे ते मला सांगत होते. जेवण झाल्यावर गोळ्या घ्यायच्या होत्या. त्यामुळे त्यांना जेवण जाणे आवश्यक होते. ते सांगत असतांनाच माझ्या मनात तीव्रतेने विचार आला, ‘आता सौ. जिजी काही दिवसच आपल्यात आहेत. त्यांना लगेच भेटायला जाऊया’, असे वाटले.
२. एकत्र सेवा करणार्या दोन साधिकांच्या मनात एकाच वेळी जिजींना भेटण्याचा विचार आल्यावर त्यांना एकत्रित भेटायला जाणे
माझे जेवण झाल्यावर मला सहसाधिका सौ. आनंदी पांगुळ भेटल्या आणि आम्ही दोघी एकमेकींकडे पाहून ‘जिजींकडे जाऊया का ?’, असे एकदम म्हणालो. ‘त्या वेळी तोही विचार दोघींना देवानेच दिला आहे’, असे मला जाणवले. त्यांच्या खोलीत गेल्यावर जाखोटियाकाका म्हणाले, ‘‘ती जेवत नाही.’’ ते जिजींकडे पाहून म्हणाले, ‘‘बघ. काकू आल्या आहेत. त्याही तुला जेवायला सांगत आहेत.’’ इतक्या वेदना होत असतांनाही सौ. जिजी आनंदी होत्या. त्या म्हणाल्या, ‘‘या बसा.’’
३. गुरुपरंपरेतील नावे घेऊन जिजींना एकेक घास भरवल्याची कृती नकळत होऊन त्यांना आनंद होणे
बर्याच वेळा या आधी त्यांच्या खोलीत गेल्यावर आम्ही जयघोष आणि श्रीकृष्णाचा श्लोक म्हणत होतो. तेथे गेल्यावर मी त्यांना म्हणाले, ‘‘आपण नेहमीप्रमाणे जयघोष करूया ना ?’’ त्या ‘‘हो’’ म्हणाल्या. जयघोष आणि श्लोक म्हटल्यावर मी काकांच्या हातातील मऊ भाताचे वाडगे घेऊन म्हणाले, ‘‘मी भरवू का ?’’ काका म्हणाले, ‘‘बघा खाते का ?’’ मी गुरुपरंपरेतील नावे घेऊन त्यांना एकेक घास भरवायला प्रारंभ केला. ही कृती माझ्याकडून इतकी सहजतेने झाली की, मला कळलेच नाही. त्या वेळी त्यांनाही पुष्कळ आनंद झाला.
४. ‘जिजींना घास भरवत नसून प.पू. गुरुमाऊलींजवळ जाणार्या जिवाला चैतन्याचे घास भरवत आहोत’, असे जाणवणे आणि सनातनचे एकेक सद्गुरु अन् संत यांची नावे घेऊन घास भरवल्याने त्यांना पुष्कळ आनंद झाल्याचे त्यांच्या तोंडवळ्यावरून दिसणे
तेव्हा मला ‘मी सौ. जिजींना घास भरवत नसून प.पू. गुरुमाऊलींजवळ हा जीव जाणार आहे आणि त्या जिवाला चैतन्याचे घास भरवत आहोत’, असे जाणवत होते. ‘त्यानंतर आता हा जीव काही घंटेच आपल्यात आहे’, असा विचार आला. नंतर ‘मी हातात वाडगे धरते’, असे म्हणून त्यांनी ‘तुम्ही एकेक संतांचे नाव घ्या’, असे मला खुणेने सांगितले. नंतर सनातनचे एकेक सद्गुरु आणि संत यांची नावे घेऊन त्या एकेक घास खात होत्या. त्यांचा एक घास खाऊन झाला की, त्या माझ्याकडे बघायच्या. मग मी दुसर्या संतांचे नाव घ्यायचे. मगच त्या घास घेत होत्या. त्यांचा भात कधी खाऊन झाला, त्यांना कळलेच नाही आणि त्यांना पुष्कळ आनंद झाल्याचे त्यांच्या तोंडवळ्यावरून दिसत होते. मला तो जीव आतून पुष्कळ आनंदात आहे’, असे जाणवत होते. आज त्यांचे निधन झाल्याचे समजले, तेव्हा देवाने दिलेली ती पूर्वसूचनाच होती, हे लक्षात आले.
‘परात्पर गुरु डॉक्टर, आपणच त्या जिवासाठी सर्व कृती करवून घेतल्यात, त्यासाठी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्रीमती मनीषा गाडगीळ, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१६.६.२०२१)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |