ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांची सुटका करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू ! – आमदार महेश शिंदे

जिल्हाधिकारी कार्यालयावर भजन आंदोलन करतांना ह.भ.प. घनश्याम महाराज नांदगावकर, आमदार महेश शिंदे आणि वारकरी

सातारा, १० जुलै (वार्ता.) – श्रीक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी वारीसाठी निघालेले ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी स्थानबद्ध करून ठेवले आहे. त्यांची सुटका करावी, या मागणीसाठी कोरेगाव मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर भजन आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना याविषयी निवेदन देण्यात आले असून ह.भ.प. बंडातात्या यांची सुटका न केल्यास भविष्यात तीव्र आंदोलन करण्याची चेतावणी आमदार महेश शिंदे यांनी दिली आहे.

आषाढी वारीसाठी निघालेले ह.भ.प. बंडातात्या यांना पोलिसांनी कह्यात घेऊन कराड येथील करवडी गोपालन केंद्रात स्थानबद्ध केले आहे. गोपालन केंद्राला पोलिसांनी वेढा दिला असून कुणालाही आतमध्ये जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. यामुळे सरकारचा निषेध करण्याचे सत्र गत २ दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यात चालू आहे. ९ जुलै या दिवशी ह.भ.प. घनश्याम महाराज नांदगावकर यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार महेश शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये भजन आंदोलन करण्यात आले. या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.