सातारा – सातारा नगरपालिकेच्या वतीने नियोजित कामाची निविदा काढण्यात आली; मात्र निविदा प्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्या ठेकेदारावर नियमबाह्य पद्धतीने कारवाई करत चढ्या दराने स्वत:च्या ठेकेदाराला कामे दिल्याचा आरोप नगरविकास आघाडीचे नगरसेवक अविनाश कदम यांनी केला आहे. याविषयी कदम यांनी लेखी निवेदन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनाही दिले आहे.
सातारा नगरपालिकेने शहरांतर्गत निविदा काढून रस्त्यांची कामे चालू केली होती. त्यानुसार एका ठेकेदाराने काम चालू केले. काही दिवसांनी ठेकेदाराने कामासाठी दरवाढ केल्याचे पत्र पालिका प्रशासनाला दिले. त्यानंतर तत्कालिन मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी संबंधित ठेकेदाराची निविदा रहित करून त्याला काळ्या सूची िटाकण्याची प्रक्रिया चालू केली. याची माहिती मिळताच संबंधित आस्थापनाने ‘मागिल दरानुसार काम करू’, असे लेखी पत्र पालिका व्यवस्थापनाला दिले; मात्र त्याकडे दुर्लक्ष करत फेरनिविदा काढण्यात आली. या वेळी अल्प दरात काम करण्यास सर्वच ठेकेदारांनी असमर्थता दर्शवली; मात्र तरीही पूर्वीच्या ठेकेदाराच्या दराहून चढ्या दराने नव्या ठेकेदाराला निविदा देण्यात आली. हा सर्व प्रकार संशयास्पद असून याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी निवेदनामध्ये करण्यात आली आहे.