अशी मागणी मासेमारांना का करावी लागते ? सार्वजनिक बांधकाम खाते काय करत आहे ?
अशा प्रकारे धोकादायकरित्या ‘काँक्रीट’चे दगड खाडीच्या मुखाशी टाकणार्या ठेकेदारावर कारवाई व्हायला हवी ! |
वेंगुर्ले – तालुक्यातील नवाबाग येथे मांडवी खाडीच्या मुखाशी आधुनिक बंधार्याचे (ब्रेक वॉटर) काम चालू आहे. यासाठी सिद्ध करण्यात आलेले ‘काँक्रीट’चे त्रिशंकू आकाराचे मोठे दगड ठेकेदाराने किनार्यावर अस्ताव्यस्त टाकले आहेत. त्यामुळे पारंपरिक मासेमार आणि यांत्रिक पद्धतीने मासेमारी न करणारे यांना मोठा अडथळा निर्माण झाला आहे. या भागात मासेमारी केल्यास मासेमारांची जीवित किंवा मोठी वित्त हानी होऊ शकते. त्यामुळे हे त्रिशंकू दगड तातडीने हटवण्यात यावेत, अशी मागणी पारंपरिक रापण संघ आणि यांत्रिक पद्धतीने मासेमारी न करणारे पारंपरिक मासेमार यांनी जिल्हाधिकारी, साहाय्यक मत्स्य आयुक्त, शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर आणि स्थानिक प्रशासन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, मांडवी खाडीच्या मुखाशी (खाडी आणि समुद्र यांच्या संगमाचे ठिकाण) साचणार्या गाळाला प्रतिबंध करण्यासाठी ‘अत्याधुनिक बंधारा’ (ब्रेक वॉटर) व्हावा, अशी गेल्या कित्येक वर्षांची मागणी होती. वर्ष २०१९-२० मध्ये बंधारा बांधण्यास संमती मिळाली. बंधार्यासाठीच्या साहित्याच्या जोडणीचा एक भाग म्हणून ठेकेदाराने येथे सिमेंट काँक्रिटचे त्रिशंकू आकाराचे मोठे दगड सिद्ध करून अस्ताव्यस्त ठेवले आहेत. बंधार्याचे काम चालू होईपर्यंत अस्ताव्यस्त टाकलेले दगड उचलून अन्यत्र ठेवावेत. याविषयी ठेकेदाराला सांगूनही त्याने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे दगड बाजूला करून मासेमारीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी.