जयपूर येथे गायीच्या शेणापासून रंगाची निर्मिती करण्याच्या प्रकल्पाचे उद्घाटन

हा एक चांगला प्रकल्प असून यामुळे गायीचे महत्त्व समाजाला पटेल; मात्र त्यासह सर्वत्र गोहत्याबंदी कायदा राबवून गायींची हत्या रोखणे आवश्यक आहे !

ऑनलाईन उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

जयपूर (राजस्थान) – येथे गायीच्या शेणापासून रंगाची निर्मिती करण्याचा प्रकल्प चालू करण्यात आला आहे. येथेे शेणापासून रंग बनवण्याच्या स्वयंचलित यंत्राचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ऑनलाईन उपस्थिती लावत कार्यक्रमाचे उद्घाटन केले. ‘संपूर्ण भारतात गायीच्या शेणापासून बनलेल्या ‘वेदिक’ रंगाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी आणि तरुण उद्योजक या क्षेत्रात आणण्यासाठी मी प्रयत्न करीन’, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. शेणापासून बनवलेला रंग हा विषमुक्त आणि इको फ्रेंडली (पर्यावरण पूरक) आहे. या रंगामध्ये शिसे, पारा, क्रोमियम, आर्सेनिक आणि कॅडमियम यांचा वापर करण्यात आला आहे. या शेणापासून बनवलेल्या रंगाची विक्री वाढली, तर शेतकर्‍यांकडील शेणाची खरेदी वाढेल. त्यामुळे शेतकर्‍यांच्या उत्पन्नात भर पडून वर्षाकाठी न्यूनतम ३० सहस्र रुपये त्यांना शेणाच्या विक्रीतून मिळू शकतात.