फ्रान्सकडून आजी आणि माजी पंतप्रधानांची चौकशी होणार !

राफेल विमान विक्रीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप !

राफेल विमान

पॅरिस (फ्रान्स) – भारताने फ्रान्सकडून खरेदी केलेल्या राफेल लढाऊ विमानांच्या करारामध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपाची आता फ्रान्सकडून न्यायालयीन चौकशी केली जाणार आहे. फ्रान्समधील संस्था ‘शेरपा’ने या प्रकरणी तक्रार केली होती. तसेच फ्रान्समधील नियतकालिक ‘मीडियापार्ट’ने या प्रकरणी अहवाल प्रकाशित केला होता. यानंतर चौकशीचा निर्णय घेण्यात आला आहे. वर्ष २०१८ मध्ये शेरपाने तक्रार केली होती; मात्र तेव्हा ती फेटाळण्यात आली होती. १४ जूनपासून एका न्यायाधिशांकडून या आरोपाचे अन्वेषण चालू करण्यात आले आहे.

१. फ्रान्सचे माजी पंतप्रधान फ्रांस्वा ओलांद यांनी करारावर स्वाक्षरी केली होती, तर आताचे पंतप्रधान इमॅन्युएल मॅक्रॉन हे तेव्हा अर्थमंत्री होते. या दोघांचीही चौकशी केली जाणार आहे. तत्कालीन संरक्षणमंत्री आणि सध्याचे परराष्ट्रमंत्री जीन-यवेस ले ड्रियान यांचीही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.

२. राफेल विमान बनवणारे आस्थापन ‘दसॉल्ट एव्हीएशन’कडून अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. याआधी या आस्थापनाने घोटाळ्याचा आरोप फेटाळला होता.

३. वर्ष २०१६ मध्ये भारत आणि फ्रान्स यांच्यात करार झाला होता. ३६ राफेल विमाने देण्यासाठी हा करार होता. त्या वेळी भारतातही यावरून आरोप करण्यात आले होते.