सातारा – पथदिव्यांची वीजदेयके थकल्यामुळे महावितरणने गावोगावी अंधार केला आहे. सरकारने ग्रामपंचायतींच्या विकासकामांच्या निधीतून वीजदेयके देण्याचे अन्याय आदेश काढले आहेत. ते तातडीने रहित करून सरकारने वीजदेयके भरावीत, अशी मागणी कराड तालुक्यातील सुपणे-तांबवे विभागातील ग्रामपंचायतींनी सभापती प्रणव ताटे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणीही दिली आहे.
पथदिव्यांचे वीजदेयक आतापर्यंत सरकार भरत होते. त्यासाठी दिवाबत्ती कर आकारला जात होता. दळणवळण बंदीमध्ये वीजदेयके रहित करण्यात आली नाहीत. महावितरणने दळणवळण बंदीत नागरिकांच्या वीज जोडण्या तोडून अन्याय केला आणि आता सरकारने पथदिव्यांची वीजदेयके ग्रामपंचायतींना भागवण्यास सांगितले आहे. याचा परिणाम ग्रामीण भागाच्या विकासावर होईल, अशी चिंता ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.