सातारा – सातारा शहर सीमावाढ झाल्यामुळे शाहूपुरी, विलासपूर इतर भागातील विकासकामे निधीअभावी रखडली आहेत. ही कामे मार्गी लावण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देतांना सातारा नगरपालिकेवर आर्थिक ताण येत आहे. यामुळे या भागांसाठी यापूर्वी ग्रामविकास विभागाने ३ कोटी रुपयांचा निधी संमत केला होता. तो निधी पालिकेकडे वर्ग करावा, अशी मागणी पालिका प्रशासनाने शासनाकडे केली आहे.
७ मासापूर्वी सातारा नगरपालिकेची सीमावाढ झाली. यामध्ये शहरालगत असणार्या शाहूपुरी, विलासपूर, दरे खुर्द, शाहूनगर, पिरवाडीसह इतर भाग पालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आला. यामुळे ग्रामपंचायतींचे अस्तित्व संपुष्टात आले. यापूर्वी ग्रामपंचायतींनी विविध विकासकामांसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवले होते. त्यामध्ये ३ कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती. तो प्रस्ताव मान्य करून जिल्हा परिषदेकडे हा निधी शासनाकडून वर्ग करण्यात आला होता. सीमावाढीमुळे ग्रामविकास विभागाच्या कह्यात असलेला भूभाग आता नगरविकास विभागाच्या कह्यात आला. त्यामुळे या भागातील विकासकामांसाठीचा निधी तांत्रिक गोष्टींमुळे जिल्हा परिषदेकडे अडकून पडला आहे. हा निधी मिळत नसल्यामुळे सातारा नगरपालिकेला अडचण येत आहे.