महाविकासआघाडी सरकार राज्यात केंद्रीय कृषी कायद्यात जुजबी पालट केलेला नवा कायदा आणू पहात आहे ! – किसान सभेचा आरोप

किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले

नगर – केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांना महाविकास आघाडी सरकार एकीकडे विरोध करत आहे, तर दुसरीकडे त्यात जुजबी पालट करून ते राज्यात लागू करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप किसान सभेने केला आहे. ‘जे पालट करायचे आहेत, त्यांचा मसुदा घोषित करूनच निर्णय घ्यावा. अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू’, अशी चेतावणी किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी दिली आहे.

केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना होणारा विरोध पहाता सर्वोच्च न्यायालयानेही या कायद्याच्या कार्यवाहीला स्थगिती दिली आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी केंद्रीय कृषी कायद्याला विरोध केला आहे; मात्र या कायद्यांमधील बहुतांशी तरतुदी नव्या कायद्याच्या रूपाने महाराष्ट्रात लागू करणे निषेधार्ह आणि संशयास्पद असल्याचे नवले यांनी सांगितले.