ओडिशा राज्यातील पुरी येथील पूर्वाम्नाय श्रीगोवर्द्धनमठ पीठाधीश्वर श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य श्री स्वामी निश्चलानंद सरस्वती महाराज यांनी नुकतेच ‘हिंदु राष्ट्रा’विषयी पुन्हा एकदा मोठे विधान केले आहे. त्यांनी म्हटले आहे, ‘‘संयुक्त राष्ट्र संघाने भारत, नेपाळ आणि भूतान या देशांना हिंदु राष्ट्र म्हणून घोषित करावे.’’ त्यांच्या याविषयीच्या मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे की, जगातील २०४ देशांपैकी बहुसंख्य ख्रिस्ती आहेत, तर ५० हून अधिक मुसलमान आहेत; पण हिंदूंचा देश नाही. त्यामुळे या देशांना हिंदु राष्ट्र म्हणून घोषित करणे, हे संयुक्त राष्ट्र संघाचे दायित्व आहे. जगातील कुठल्याही देशातील हिंदूंचा छळ होत असेल आणि त्यांना त्यांचा देश सोडायचा असेल, तर त्यांना वरील देशांत आणून वसवले पाहिजे आणि त्यांना योग्य त्या सर्व सुविधा दिल्या पाहिजेत. धर्मांतर आणि घुसखोर रोहिंग्यांची दहशत हे प्रश्न आणि संबंधित कायदे यांविषयी अप्रत्यक्ष सूचक भाष्यही त्यांनी केले आहे. शंकराचार्य पुढे म्हटले की, आदी शंकराचार्य आणि यादव राजे यांनी सूर्याेपासक पारशांना ‘अतिथी देवो भव’ म्हणून चर्चा करून भारतात स्थान दिले अन् आतापर्यंत तेही हिंदूंप्रती कृतज्ञ राहिले. तेच स्थान ख्रिस्त्यांना कालिकतमध्ये दिले; पण त्यांनी हिंदूंना अल्पसंख्यांक करण्याचे प्रकल्प उभे केले आणि हिंदूंचे धर्मांतर केले. मुसलमान आक्रमक म्हणून आल्याने हिंदु राजे त्यांच्याशी लढले; पण जेव्हा ते शरण आले तेव्हाही त्यांना स्थान दिले; तरी त्यांनी त्यांची आक्रमकता सोडली नाही. ‘आमची दया अशा प्रकारे विघातक होऊ नये’, हा आमचा संकेत आहे. शासनाने स्वतःची सहिष्णुता जपण्यासाठी सर्वांना कल्पना देऊन ठेवावी. (म्हणजे जेव्हा वेळ येईल, तेव्हा अडचण येणार नाही.) एवढ्यावरच न थांबता त्यांनी पुढे म्हटले आहे, ‘‘शासनाने हे गांभीर्याने घ्यावे आणि त्यांनी घेतले नाही, तरी आमची वाणी सत्य होते. भारत ही धार्मिक आणि आध्यात्मिक राजधानी म्हणून नावारूपाला येईल, यात काही शंका नाही.’’ वरील गोष्ट पटवण्यासाठी त्यांनी जे अत्यंत समर्पक उदाहरण दिले आहे, ते पुष्कळ काही सूचित करणारे आहे. ते म्हणतात की, गटारातील मासे चांगल्या सात्त्विक पाण्यात मरतात, खार्या पाण्यातील मासे गोड्या पाण्यात मरतात आणि गोड्या पाण्यातील मासेही खार्या किंवा घाणेरड्या पाण्यात मरतात. यातून काय ते समजून जावे. असे न होण्यासाठी शासनाने काळजी घ्यावी. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या अनुषंगाने जगद्गुरु शंकराचार्य यांची वरील वक्तव्ये ही अत्यंत समयसूचक, काळाचा वेध घेणारी, राष्ट्रस्थितीचे योग्य विश्लेषण करणारी आणि योग्य ती चेतावणी देणारी अशा अनेकार्थाने महत्त्वाची आहेत.
देश आणि भारतीय यांची सद्यःस्थिती
सध्या सार्या जगाप्रमाणे आपला देशही विचित्र स्थितीतून जात आहे. एका बाजूला सर्व सक्षमता असूनही दुसरीकडे सर्वत्र खिंडारे पडलेली दिसत आहेत. जणू नागरिकांमधील शक्ती जाऊन ते हतबल झाले आहेत. कोरोनाच्या संकटामुळे आलेले आर्थिक संकट, गरिबी, भ्रष्टाचाराने केलेला डोंगर, गुन्हेगारीने गाठलेला कहर; दुसरीकडे शत्रूची सीमेपलीकडून चाललेली आक्रमणे; तिसरीकडे शत्रूला मिळालेल्या हिंदुविरोधकांची अंतर्गत बंडाळी आणि त्यातून होणारी नक्षलवादी अन् साम्यवादी यांची आक्रमणे, बंगालसह संपूर्ण देशातील दंगली, देशभर आलेला धर्मांतराचा पूर, घुसखोरांनी निर्माण केलेली दहशत; चौथीकडे नैसर्गिक आपत्तींमुळे येत असलेली संकटे असे चहुबाजूंनी भारताला आणि भारतियांना घेरले आहे. डासांपासून खड्ड्यांपर्यंतच्या प्रतिदिनच्या सहस्रो समस्यांनी सामान्य माणसाला निराशा आणि त्रस्तता येते. कितीही सक्षम व्यवस्थापन आले, तरी ही सर्व स्थिती पटकन पालटण्यासारखी नाही. सामान्यांना हे कळून चुकले आहे की, कुठलाही पक्ष आणि कितीही मोठा नेता आला, तरी आपल्या दुःखाला पर्याय नाही आणि अडचणींना अंत नाही. या सगळ्यांतून सकारात्मक आशेचा किरण कुठे दिसू शकणार आहे का ? तर सर्वांच्या मनाला उभारी देणारा हिंदु राष्ट्र स्थापनेचा विषय हा सर्व समस्यांवरील उत्तराकडे नेणारा आहे. याचे कारण असे की, जेव्हा परिस्थिती अधिकाधिक वाईट होत जाते, तेव्हाच पुढे चांगल्याची निर्मिती होते, हे काळाचे शास्त्र आहे.
निराशा घालवणारे आशेचे किरण
गेल्या काही दिवसांत झालेले परिवर्तन आपल्या दृष्टीतून सुटू शकत नाही. केंद्रातील मंत्री ‘लव्ह जिहाद’ नाही म्हणत असतांना ३ राज्यांत त्या विरोधातील कायदा होत आहे. स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत धर्मांतर चालूच आहे; पण आता माध्यमांनी तो प्रश्न उचलला आहे. इतकी वर्षे गोहत्या, लव्ह जिहाद, धर्मांतर हे प्रश्न जणू नाहीतच अशा तद्दन ढोंगी आविर्भावात तथाकथित निधर्मी वावरत होते आणि हिंदुत्वनिष्ठांना तुच्छ लेखले जात होते. हिंदूंवरील एक एक अन्याय बाहेर येत आहे आणि माध्यमांद्वारे त्यांना प्रसिद्धी मिळून त्यातील सत्य पुढे येत आहे. आता धर्मांतरविरोधी कायद्यासाठीही हिंदूंचा दबाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत. ‘३७० कलम’ रहित होईल, असे कुणाला स्वप्नातही वाटले नव्हते. पाकमधील पीडित हिंदूंना भारतात आश्रय मिळणे तुलनेने सुलभ होत आहे. घुसखोरांचा प्रश्न सुटण्याच्या टप्प्याच्या दिशेने जात आहे. राममंदिरानंतर मथुरेचे मंदिर न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. हिंदूंची म्हणजे भारतियांची निराशा घालवू शकणारे हे सारे आशेचे किरण आहेत. हा सारा पालट होणे ही काळाची गती आहे. सनातन संस्थेने २ दशकांपूर्वी या उद्देशानेच विविध नियतकालिके, आणि संकेतस्थळे चालू केली, तसेच हिंदु जनजागृती समितीने एका दशकापूर्वी अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन घेणे आरंभ केले, ते हिंदु राष्ट्र निर्मितीच्या उद्देशानेच. त्या वेळी ‘हिंदु राष्ट्र’ हा शब्द उच्चारणेही काहीतरी मोठा गुन्हा असल्याप्रमाणे समजले जायचे. मूलतः चैतन्यमय ‘हिंदु’ या शब्दातील चैतन्य हळूहळू देशवासियांत पसरत असून हिंदु राष्ट्राची संकल्पना हळूहळू हिंदुत्वनिष्ठांच्या मनात आकार घेत आहे. हिंदूंचे धर्मगुरु साक्षात् शंकराचार्यांनीही पुन्हा एकदा ते दृगोच्चर केले. त्यांच्या संकल्पाने त्यांचे बोलही खरे ठरतील. धर्मसंस्थापनेचे हे कार्य साक्षात् ईश्वराचे असल्याने ईश्वर हे महत् कार्य करीलच. या काळाचे साक्षीदार असलेल्या सुजाण हिंदूंनी त्यासाठी हातभार लावून त्यांच्या काठ्या गोवर्धनाला लावाव्यात इतकेच !