संपादकीय : अपप्रवृत्तींना रोखा !

गोव्यात पर्यटक येण्याच्या संख्येत घट झाल्याच्या बातम्या प्रसारित करून गोवा सरकारची अपकीर्ती करण्याची मोहीम राबवली जात असल्यावरून सत्ताधार्‍यांमध्ये नुकतीच चिंता पसरली होती. ही अपकीर्ती आहे कि वस्तूस्थिती आहे, ते पर्यटन हंगाम संपल्यानंतरची आकडेवारी सांगेलच; पण पर्यटन क्षेत्रात किंवा मुख्यतः समुद्रकिनारी जे काही अपप्रकार चालले आहेत, ते मात्र अफवा नसून सत्य आहेत. मसाज करण्याच्या नावाखाली फसवणे, पर्यटकांच्या वस्तू पळवणे, अमली पदार्थांची रेलचेल हे प्रकार पर्यटन क्षेत्रात कित्येक वर्षांपासून आहेतच; पण आता पर्यटकांना ‘मुली पुरवतो’ असे सांगून त्यांना लुबाडणे, पर्यटकांना मारहाण करणे, नाईट क्लबमधून मोठ्या आवाजातील संगीताद्वारे ध्वनीप्रदूषण यांसारख्या समस्या वाढल्या आहेत.

पर्यटन व्यवसायामुळे राज्याच्या सरकारी तिजोरीत भर पडते. हॉटेलचालक, होम स्टे चालवणारे, शॅकचालक, बार आणि रेस्टॉरंट (मद्य आणि जेवण पुरवणारी उपाहारगृहे), पर्यटक टॅक्सीचालक हे थेट पर्यटकांवर अवलंबून असलेले व्यावसायिक आहेत, तर राज्यातील अन्य व्यावसायिकांनाही राज्यात पर्यटक आल्याने व्यवसायात लाभ होतो. असे जरी असले, तरी राज्यात येणार्‍या पर्यटकांची जर फसवणूक होत असेल किंवा त्यांना मारहाण होत असेल, तर त्याविषयी त्यांच्याकडून गोव्याविषयीची प्रतिक्रिया उमटणार, हे लक्षात घेतले पाहिजे. परराज्यांतील काही युवकांनी गोव्यात त्यांना कसे लुटले गेले ?, हे सांगणारे व्हिडिओ प्रसारित केले आहेत. यातूनही गोव्याची अपकीर्ती होते. या अपकीर्तीला फसवले गेलेले युवक उत्तरदायी नसून त्यांची फसवणूक करून त्यांना लुटणारे दलाल उत्तरदायी आहेत.

‘अन्याय रहित जिंदगी’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार उत्तर गोव्यात सध्या वेश्याव्यवसाय चालवणारे दलाल जोमात कार्यरत आहेत. म्हापसा बसस्थानकावर काही महिला उभ्या असतात. ग्राहक म्हापसा बाजारात येतात आणि या महिलांना हॉटेल्स किंवा परिसरात घेऊन जातात. बहुतांश महिला या पुणे येथील बुधवार पेठ, मुंबई येथील कामाठीपुरा आणि कोलकातामधील सोनागाची या वेश्याव्यवसाय भागांतील आहेत. या महिला बाजारात जाणारे लोक, विद्यार्थी आणि दुकानदार यांना त्रास देतात, असा आरोप आहे. गोव्यात अशी परिस्थिती निर्माण होणे समाजाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. पर्यटकांची फसवणूक करणारे दलाल असोत किंवा वेश्याव्यवसाय चालवणारे दलाल असोत, हे सर्व परराज्यांतील आहेत. या अपप्रवृत्ती गोव्याबाहेरून गोव्यात शिरलेल्या आहेत आणि त्याचा संसर्ग स्थानिक गोमंतकियांना होऊ शकतो. कोणत्याही फळझाडावरची बांडगुळे वाढली की, ती मूळ झाडाचा जसा नाश करतात, त्याचप्रमाणे या परराज्यांतील अपप्रवृत्ती गोमंतकियांना नासवून वाममार्गाला लावू शकतात. अमली पदार्थ व्यवहार प्रारंभी विदेशी हिप्पी पर्यटकांमध्येच चालायचा. आता यामध्ये स्थानिकांचाही सहभाग दिसून येतो. त्याचप्रमाणे वेश्याव्यवसायातही स्थानिक शिरले तर ? यामुळेच या अपप्रवृत्ती ठेचून काढणे आवश्यक असून पर्यटन धोरण ठरवतांना त्यामध्ये या अपप्रवृत्ती रोखण्यावरही विचारविनिमय होणे आवश्यक आहे !