संपादकीय : शाश्वत यश !

एस्.एन्. सुब्रह्मण्यन् (डावीकडे): प्रतीकात्मक छायाचित्र

स्पर्धात्मक वातावरणात मनुष्याच्या कुशलतेचा कस लागतो. या माध्यमातून त्याला अवगत असलेले त्याच्यातील गुणच नव्हे, तर नवीन आव्हाने अंगावर झेलल्याने सुप्त गुणांचा परिचयही होतो. या वैयक्तिक मंथनात व्यक्तीला स्वत:तील उणिवाही लक्षात येत असतात. यातून एक चांगले, प्रभावी, उद्योगशील व्यक्तीमत्त्व घडत असते. या प्रक्रियेद्वारे कुटुंब, समाज आणि पर्यायाने राष्ट्राचा विकास साधला जातो. हा विकास सर्वंकष स्तरावर असला पाहिजे, तर त्याला शाश्वतता प्राप्त होते, हे लक्षात घेतले पाहिजे. यासाठी गेल्या काही दशकांपासून ‘वर्क-लाईफ बॅलेंस’ ही संज्ञा रूढ झाली आहे. आपले व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवन यांतील समतोल राखला जाणे, असा या संज्ञेचा अर्थ ! आपली नोकरी आणि जीवन यांच्यातील समतोल राखल्यास कामासह समाधान, कौटुंबिक सुख, सामाजिक जाणीव आदी भागही व्यक्ती अनुभवू शकते. या सगळ्याचा विचार करून ‘इमोशनल इंटेलिजन्स’ (ईआय) या पाश्चात्त्यांना आता उमगलेल्या संकल्पनेची उत्पत्ती झाली. आस्थापने चांगला ‘ईआय’, म्हणजेच भावनिक बुद्धीमत्ता असणार्‍यांचा शोध घेत असतात. हे सूत्र अधिक करून व्यवस्थापकीय कामांसाठी अधिक लागू पडते. स्वत:च्या, तसेच आपल्या सहकार्‍यांच्या भावनांची जाणीव ठेवता येण्याची, त्या नियंत्रित करता येण्याची आणि त्यांचे वस्तूनिष्ठ मूल्यमापन करण्याची क्षमता यांचा अभ्यास याद्वारे केला जातो. एक चांगला व्यवस्थापक (मॅनेजर) ओळखण्यासाठीचा ‘ईक्यू’ हा एक महत्त्वाचा निकष आहे. यातून व्यवस्थापकाला त्याच्या ‘टीम’कडून चांगले काम करून घेता येते आणि त्यातून एकूण आस्थापनाची उत्पादकता वाढते. मुळात एकेक कर्मचारी त्या संघाचा अविभाज्य घटक असल्याने त्याच्यामध्येही ‘ईआय’ची पातळी चांगली असणे क्रमप्राप्त आहे. थोडक्यात ‘ईआय’ चांगला असल्यास व्यक्तीतील सकारात्मकता, स्वतंत्रपणे कार्य करण्याची क्षमता, आत्मविश्वास, सामाजिक दायित्वाची जाणीव, उत्पादकता, प्रत्येकाशी असलेले संबंध, लवचिकता, ताण सहन करण्याची क्षमता आदी भागही चांगले असतात. या सगळ्या गोष्टी असलेले लोक त्यांच्या व्यावसायिक जीवनात पुष्कळ यशस्वी होतात. मग एखादी व्यक्ती कुशाग्र बुद्धीमान नसली; परंतु तिच्यातील भावनिक बुद्धीमत्ता चांगली असली, तर ती अधिक पुढे जाते, हा अनुभव आहे.

हा सगळा खटाटोप प्रामुख्याने मनुष्याला व्यावहारिक जीवनात यश मिळण्यासाठी आहे; पण यामध्ये अनेक वेळा मनुष्याच्या सर्वांगीण उन्नतीपेक्षा व्यवसायाची भरभराट करण्याकडे व्यावसायिकांचा कल असतो कि काय ? असा प्रश्न पडतो. जरी याचे गुपित हे स्पर्धेत टिकून रहाण्याच्या आणि स्वत:च्या आस्थापनाची प्रासंगिकता टिकवून ठेवण्याच्या ऊर्जेत दडलेले असले, तरी हा विषय अनेक वेळा कर्मचारी अन् अधिकारी वर्गाला मारक ठरतो. ‘लार्सेन अँड टुब्रो’ या प्रथितयश आस्थापनाचे अध्यक्ष एस्.एन्. सुब्रह्मण्यन् यांच्या एका वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. ते म्हणाले, ‘‘स्पर्धात्मक रहाण्यासाठी कर्मचार्‍यांनी आठवड्याला (सोमवार ते शनिवार) ९० घंटे काम केले पाहिजे. प्रसंगी रविवारीसुद्धा कामावर आले पाहिजे.’’ सुब्रह्मण्यन् यांच्या वक्तव्याचा अर्थ असा की, जिथे ‘फाईव्ह डे वीक’ आहे, तेथील कर्मचार्‍यांनी प्रतिदिन तब्बल १८ घंटे काम करावे किंवा शनिवार-रविवार येऊनही कामाला जुंपावे आणि जेथे शनिवार हा कामाचा वार आहे, तेथे प्रतिदिन किमान १५ घंटे काम केले पाहिजे. याविषयी सुब्रह्मण्यन् स्पष्ट करतांना पुढे म्हणाले, ‘‘मी स्वत: रविवारीही काम करतो. तुम्ही घरात बसून काय करता ? तुम्ही तुमच्या पत्नीकडे किती वेळ पहात बसणार ? पत्नीही त्यांच्या पतींकडे किती वेळ पहात बसणार ? त्यामुळे (रविवारीही) कार्यालयात येऊन काम करा !’’

सुब्रह्मण्यन् यांच्या वक्तव्याला सामाजिक माध्यमांतून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. काही उद्योगपतींनीही या वक्तव्याला विरोध दर्शवला आहे. मुळात हिंदुद्वेष्टे असले, तरी यासंदर्भात ‘आर्.पी.जी. ग्रुप’चे अध्यक्ष हर्ष गोयंका यांनी बुद्धीमान वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, ‘‘हुशारीने आणि परिश्रम घेऊन काम करण्याला मी प्राधान्य देतो; परंतु संपूर्ण जीवनच कार्यालयात घालवणे अयोग्य आहे. ‘वर्क-लाईफ बॅलेंस’ हे वैकल्पिक असू शकत नाही, तर ते आवश्यक आहे, असे मी मानतो.’’ मॅरिको आस्थापनाचे अध्यक्ष हर्ष मारिवाला यांनी म्हटले, ‘‘परिश्रमपूर्वक काम करणे, हे यश मिळवण्यासाठी अत्यावश्यक असले, तरी यशस्वी होण्यासाठी आपण किती घंटे काम करतो, हे तितकेसे महत्त्वाचे नाही. आपण जेवढे घंटे काम करतो, त्यामध्ये आपल्या कामाची गुणात्मकता आणि किती आवडीने आपण काम करतो (‘पॅशन’) याला महत्त्व आहे.’’ सुब्रह्मण्यन् यांना अनेक लोकांनी आरसा दाखवत त्यांचे ५१ कोटी वार्षिक वेतनही मोजून दाखवले आणि त्यांच्याच आस्थापनातील कर्मचार्‍यांच्या सरासरी वेतनापेक्षा तो ५३४ पटींनी अधिक असल्याचे सांगत टीका केली. काही कालावधीपूर्वी ‘इन्फोसिस’चे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनीही देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आठवड्याला ७० घंटे काम करण्याचा सल्ला दिला होता. त्या वेळीही लोकांनी त्याला विरोध केला होता.

आध्यात्मिकता !

असे सल्ले अशा लोकांना निश्चितच लाभदायी ठरतात, जे कामचुकारपणा करत असतात आणि आस्थापनाचा लाभ वाढवण्यास हातभार लावत नाहीत नि तो कमी करतात. अर्थात् ज्याला काम करायचेच नाही, त्याला कितीही आणि काहीही सांगितले, तरी तो काम करणार नाही अन् ज्याला यशस्वी व्हायचे आहे, त्याला काही नाही सांगितले, तरी तो उत्पादनशील असतो. मुळात आस्थापनाचा आणि पर्यायाने देशाचा विकास हा मनुष्याच्या सर्वांगीण उन्नतीत दडलेला आहे, हा भाग विस्मृतीत गेलेला दिसतो. यामध्ये बुद्धीमत्ता, भावनिक बुद्धीमत्ता आदी निकषांचा विचार करण्यासह आध्यात्मिक दृष्टीकोनही लक्षात घेणे आवश्यक आहे. चीनची भरभराट झालेली आपण पहातो; परंतु कालांतराने तिचा लय होणार आहे, असे अनेक अभ्यासक सांगतात. याचे कारण तेथे लोकांमध्ये कामाला जुंपण्याची संस्कृती, नव्हे विकृती रुजवली गेली आहे. एखाद्याशी स्पर्धा करतांना त्याच्यातील गुण-दोष अंगीकारल्यास स्पर्धा करणार्‍याचीही तीच गत होत असते. चीन असो अथवा अमेरिका दोघांनीही जीवघेण्या स्पर्धेतून केवळ भौतिकवादी यश प्राप्त केले आहे. भारत हे आध्यात्मिक राष्ट्र असल्याने त्याने त्याच्या मूळ आध्यात्मिक वारशाला अनुसरून भौतिक यश प्राप्त केले पाहिजे. याने तो खर्‍या अर्थाने विकसित होईल आणि त्याचा हा विकास शाश्वत राहील. त्यामुळे पाचवी अर्थव्यवस्था असलेल्या भारताने व्यावसायिक यशप्राप्तीसाठी आध्यात्मिकतेला महत्त्व देण्याचा हा काळ आहे आणि यातूनच भारत ‘विश्वगुरु’ बनेल, हे सुब्रह्मण्यन् यांच्या वक्तव्याच्या निमित्ताने लक्षात घ्या !

घंटोन्‌घंटे काम करत बसल्याने शाश्वत यश साध्य होत नाही, हे आध्यात्मिक वारसाप्राप्त भारत जगाला सांगू शकतो, हेच खरे !