Andhra Pradesh Calvary Temple Church : गुंटूर येथील कलवरी टेंपल चर्च पाडण्यात येणार !

  • चर्चमध्ये प्रतिमहा ३ सहस्र हिंदूंचे केले जात होते धर्मांतर

  • चर्चविषयी आलेल्या तक्रारींवरून केलेल्या चौकशीनंतर अल्पसंख्यांक कल्याण विभागाने दिला आदेश

गुटूंर (आंध्रप्रदेश) – आंध्रप्रदेश राज्याच्या अल्पसंख्यांक कल्याण विभागाने गुंटूर जिल्ह्यातील कलवरी टेंपल चर्च पाडण्याचा आदेश दिला आहे. हे चर्च पेडाकाकानी विभागातील नंबुरू गावात आहे. हे चर्च बेकायदेशीरपणे चालवले जात होते. येथे मोठ्या प्रमाणात हिंदूंचे धर्मांतर केले जात होते. चौकशीनंतर हे उघड झाले.

१. नोव्हेंबर २०२४ मध्ये या चर्चविरुद्ध पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार करण्यात आली होती. पंचायती राज, महसूल, पोलीस आणि ध्वनीप्रदूषण नियंत्रण मंडळ यांसारख्या सरकारी विभागांच्या कायदेशीर अनुमतीविना हे चर्च चालू होते, असा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. चर्चचा पाद्री डॉ. सतीश कुमार याने कर न भरता देणग्यांद्वारे लोकांना लुटले, असाही आरोप करण्यात आला आहे.

२. तक्रारीनंतर अन्वेषणात असे दिसून आले की, चर्च बेकायदेशीरपणे कार्यरत होते आणि गरीब हिंदूंना किराणा सामान देऊन अन् खोटे दावे करून ख्रिस्ती बनवले जात होते. ऑक्टोबर २०२४ मध्ये भाग्यनगर येथील पाद्री डॉ. सतीश कुमार याच्या नेतृत्वाखालील कलवरी चर्च प्रतिमहा सुमारे ३ सहस्र हिंदूंना ख्रिस्ती धर्मात धर्मांतरित करत असल्याचे वृत्त आले होते.

पाद्री डॉ. सतीश कुमार

३. पाद्री डॉ. सतीश कुमार याने दावा केला की, त्यांनी आतापर्यंत ३ लाख ५० सहस्रांहून अधिक हिंदूंना ख्रिस्ती धर्मात धर्मांतरित केले आहे. सतीश कुमार पुढील १० वर्षांत संपूर्ण भारतात अशी ४० चर्च स्थापन करण्याची योजना आखत असल्याचे समोर आले.

४. २६ ऑक्टोबर २०२४ या दिवशी ‘एक्स’वर ‘सी.बी.एन्. न्यूज’चा (‘द ख्रिश्‍चन ब्रॉडकास्टिंग नेटवर्क’चा) एक व्हिडिओ प्रसारित झाला होता. या व्हिडिओमध्ये कलवरी टेंपल चर्चच्या धर्मांतराच्या घटनांविषयी माहिती देण्यात आली होती. यानंतर २८ ऑक्टोबरला ‘कायदेशीर हक्क संरक्षण मंचा’ने ‘एक्स’वर माहिती दिली की, काकीनाडाच्या जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानंतर महसूल अधिकार्‍यांनी कलवरी टेंपल चर्च जप्त केले. चर्चविरुद्ध भूमी हडप करणे, संशयास्पद करारांद्वारे नवीन चर्च बांधणे, कायद्याचे उल्लंघन करणे इत्यादी अनेक आरोप आहेत.

कलवरी टेंपल चर्चची माहिती

प्रतिमहा ३ सहस्र हिंदूंचे केले जात होते धर्मांतर !

‘कलवरी टेंपल चर्च’ची स्थापना वर्ष २००५ मध्ये सतीश कुमार याने केली होती. कलवरी टेंपल चर्च हे आशियातील सर्वांत मोठ्या चर्चपैकी एक आहे. त्याची सदस्यसंख्या ४ लाखांहून अधिक आहे. या चर्चमध्ये प्रत्येक आठवड्याला २० सहस्रांहून अधिक लोक उपस्थित रहातात. चर्चव्यतिरिक्त सतीश कुमार याची संस्था ‘कलवरी बायबल कॉलेज’, कलवरी रुग्णालय आणि कलवरी शाळा चालवते.

सौजन्य : The 700 Club

आंध्रप्रदेश आणि बाहेरील राजकारणासह प्रत्येक क्षेत्रात पाद्री सतीश कुमार याचा मोठा प्रभाव असल्याचे मानले जाते. तसेच सतीश कुमार याचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्रिस्ती समुदायांमध्येही मोठा प्रभाव आहे. तो मिशनरी कार्यांसाठी अमेरिका, दक्षिण आफ्रिका, कोरिया यांसह विविध देशांमध्ये वारंवार प्रवास करतो. वर्ष २०१८ मध्ये अमेरिकेचे तत्कालीन उपराष्ट्रपती माइक पेंस यांनी ‘एक्स’वर सतीश कुमार याच्यासमवेतच्या भेटीचे छायाचित्रे प्रसारित केले होते. त्यांनी या भेटीचे वर्णन ‘प्रेरणादायी’ असे केले होते.

संपादकीय भूमिका

  • केवळ चर्च पाडून थांबू नये, तर धर्मांतर करणार्‍या संबंधित पाद्रयांवरही कारवाई झाली पाहिजे, अन्यथा दुसरे चर्च उभारून धर्मांतराचे काम चालूच राहील !
  • भारत धर्मनिरपेक्ष देश असतांना अशा प्रकारे उघडपणे चर्चमध्ये हिंदूंचे धर्मांतर केले जाते, याविषयी निधर्मीवादी तोंड का उघडत नाहीत ? आणि सरकार धर्मांतरविरोधी कायदा का करत नाही ?, असे प्रश्‍न हिंदूंच्या मनात उपस्थित होतात !