जीवनातील कठीण प्रसंगांना धैर्याने सामोरे जाणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या कै. (श्रीमती) सुनंदा देऊस्कर !

जीवनातील कठीण प्रसंगांना धैर्याने सामोरे जाणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या बेळगाव येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या कै. (श्रीमती) सुनंदा देऊस्कर !

२९.५.२०२० या दिवशी श्रीमती सुनंदा देऊस्कर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८२ वर्षे होते. त्यांच्या ज्येष्ठ कन्येला त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

श्रीमती सुनंदा देऊस्कर

१. बालपण

१ अ. बालपणी हलाखीची स्थिती असणे आणि दुसर्‍यांची कामे करून घरखर्चासाठी हातभार लावत असल्याने पुरेशी झोपही न मिळणे : ‘माझ्या आईचे जीवन बालपणापासून फार हलाखीच्या स्थितीत आणि कष्टात गेले. तिचे वडील मुख्याध्यापक होते. तिच्या माहेरी ८ – ९ माणसे होती आणि उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न होता. आईने लहानपणापासूनच तिच्या बहिणीसह पाकिटात सुपारी भरण्याचे काम करून घरखर्चासाठी हातभार लावला. त्यामुळे तिला पुरेशी झोपही मिळत नसे.

२. विवाहानंतरचे कष्टप्रद जीवन

२ अ. रुग्णालयात सुईणीचे काम करणे, तसेच शिवणकाम करून चरितार्थ चालवणे : माझ्या वडिलांनी तिचा ३ मुलांसह त्याग केल्याने तिला माहेरी आश्रय घेऊन रहावे लागले. तिने रुग्णालयात सुईणीचे काम केले आणि  शिवणकाम करून चरितार्थ चालवला.

२ आ. निर्धन व्यक्तींविषयी कळवळा : ती निर्धन व्यक्तींकडून शिलाईचे पैसे घेत नसे. ती जुने कपडे गोळा करून ते दुरुस्त करून आणि स्वच्छ धुऊन निर्धन व्यक्तींना देत असे. हे सर्व करतांना तिला फार आनंद व्हायचा.

२ इ. जिद्दीने डी.एड्.चे शिक्षण पूर्ण करून शाळेतून मुख्याध्यापक पदावरून निवृत्त होणे आणि शाळेतील सर्व कर्मचारी तिचे कौतुक करत असणे : तिने घरातील सर्व दायित्व सांभाळून जिद्दीने डी.एड्.चे शिक्षण पूर्ण केले. तिला एका शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळाली. ती शाळा घरापासून बरीच लांब होती. ती चालतच शाळेत जात असे. शाळेतील सर्व कर्मचारी तिचे कौतुक करायचे. ती शाळेतून मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झाली. त्यानंतरही ती एका शाळेत विनामूल्य शिकवत असे. तिचे अनेक विषयांचे अफाट वाचन होते. तिने अनेक कथा लिहून वर्तमानपत्रे आणि दिवाळी अंक यांत प्रसिद्धीसाठी दिल्या होत्या.

२ इ. तिने अनेक कठीण प्रसंगांना हसत हसत आणि धैर्याने तोंड दिले. ती इतरांसाठीच जगली. तिने कधीच मौजमजा केली नाही.

३. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करणे 

अ. तिची देवावर अढळ श्रद्धा होती. ती अनेक वर्षे सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत होती.

आ. ती ग्रंथप्रदर्शनाची आणि स्वयंपाकाची सेवा मन लावून अन् श्रद्धेने करत असे.

इ. ती नातेवाईक आणि परिचित व्यक्ती यांना नामजप अन् साधना यांचे महत्त्व सांगून त्यांच्याकडून ते करवून घेत असे. आरंभी आईनेच मला साधना आणि सेवा शिकवली.

ई. तिची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर निस्सीम भक्ती होती. त्यांचे नुसते नाव घेतले, तरी आईच्या तोंडवळ्यावर आनंद दिसायचा.

४. रुग्णाईत स्थितीतील कृतज्ञताभाव आणि इतरांना आलेल्या अनुभूती

अ. ती २ – ३ मास अंथरूणाला खिळून होती. ‘स्वतःचे इतरांना करावे लागते’, याची तिला खंत वाटायची. तिला जेवण भरवणार्‍या व्यक्तीला ती कृतज्ञतेने नमस्कार करत असे. ती ‘सर्वांनी खाल्ले का ?’, असे विचारायची आणि ‘सर्वांनी खाल्ले’ असे सांगितल्यानंतरच ती खात असे.

आ. नंतर तिला हाता-पायांची हालचाल करता येत नव्हती. तिचा पाय कुणाला लागल्यास ती लगेच डोळे मिटून खंत व्यक्त करायची.

इ. तिच्याजवळ बसल्यानंतर मला चैतन्य मिळून हलकेपणा जाणवत असे.

५. आईच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

अ. आईच्या मृत्यूनंतर ‘एखादी दुःखद घटना घडली आहे’, असे वाटत नव्हते. घरात दाब जाणवत नव्हता.

आ. माझा नामजप एका लयीत होत होता.

इ. घरातील वातावरण शांत होते.

६. कृतज्ञता

गुरुमाऊली, आपल्या कृपेनेच अशा हसतमुख, परोपकारी, सतत इतरांचा विचार करणार्‍या आणि इतरांना आनंद देणार्‍या माऊलीच्या पोटी माझा जन्म झाला. त्यामुळे मी आपल्या श्री चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. गुरुमाऊली, ‘तिचे गुण मलाही आत्मसात करता येऊ देत’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’

– सौ. जयश्री श्रीकांत कडोलकर, कोल्हापूर (श्रीमती देऊस्कर यांची ज्येष्ठ कन्या) (२२.५.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक