कोल्हापूर शहराकरिता स्वतंत्र युनिट करून शहरातील सर्वच दुकाने चालू करण्यास अनुमती द्या ! – राजेश क्षीरसागर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कोल्हापूर – राज्य ‘अनलॉक’ होत असतांना १० लाख लोकसंख्या असलेल्या शहरांना प्रशासकीय युनिट असा वेगळा दर्जा दिला आहे. संबंधित शहरात ‘पॉझिटिव्हिटी रेट’ अल्प असल्यास जिल्ह्यापेक्षा वेगळा निर्णय घेऊन त्या शहराला ‘अनलॉक’साठी अनुमती दिली आहे. कोल्हापूर शहराला याचा लाभ मिळत नसल्याने शहराचा ‘रेट’ अल्प असूनही शहराला व्यापार चालू करण्यास अनुमती मिळत नाही. यामुळे व्यापारी आणि प्रशासन यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण होत आहे. तरी  कोल्हापूर शहराकरिता स्वतंत्र युनिट करून शहरातील सर्वच दुकाने चालू करण्यास अनुमती द्यावी, अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

या संदर्भात श्री. राजेश क्षीरसागर म्हणाले, ‘‘कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश पुन्हा चौथ्या टप्प्यात करण्यात आल्याने संपूर्ण जिल्हा सध्या ‘अनलॉक’ स्थितीत आहे. गेले अनेक मास व्यापार बंद असल्याने व्यापारी मेटाकुटीला आले असून त्यावर अवलंबून असणारे कामगार आणि इतर घटक यांचे जगणे कठीण झाले आहे. पश्चिम महाराष्ट्र उत्तर कर्नाटक, कोकण आदी परिसराचा केंद्रबिंदू कोल्हापूर आहे. येथे छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय यांसह इतर खासगी वैद्यकीय सेवा चांगल्या आणि योग्य दरात उपलब्ध असल्याने आसपासच्या भागातून शहरात भरती होणार्‍या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळेच कोल्हापूरचा ‘पॉझिटिव्हिटी रेट’ वाढला आहे. याचा फटका शहराला बसून कोट्यवधी रुपयांची हानी होत आहे. तरी यावर निर्णय तात्काळ घेण्यात यावा.’’